नागपूर - मराठा समाजाला कुठेही ओबीसी आरक्षणात समाविष्ट करून घेणार नाही याबाबत आश्वासित करण्यासाठी मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनस्थळी जाणार असल्याचं भाजपा आमदार परिणय फुके यांनी म्हटलं. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, हा सरकारने दिलेला शब्द आहे अशी आठवण फुके यांनी करून दिली.
भाजपा आमदार परिणय फुके म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्यात ओबीसी समाजाचे मोठे आंदोलन झाले होते. त्यात मी मध्यस्थाची भूमिका घेतली होती. ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाशी सरकारसोबत बैठक झाली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सगळेच उपस्थित होते. तेव्हाच या नेत्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले होते, ते कुठेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत. आजही ते या शब्दाला कायम आहेत. हेच सांगण्यासाठी मी साखळी उपोषणास्थळी जाणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही यावर आजही सगळे नेते आणि सरकार ठाम आहे. लेखी आश्वासनाची गरज असली तर तीही देऊ असं त्यांनी सांगितले.
तसेच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हा संविधानिक विषय आहे. कोणतेही सरकार आले तरी संविधानाबाहेर कुणीच निर्णय घेऊ शकत नाहीत. संविधानाच्या चौकटीत वागावे लागेल. जरांगे पाटलांची मागणी असंविधानिक आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मात्र जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजात भीतीचं वातावरण आहे. मात्र ओबीसी समाजाला आरक्षण संविधानाने दिले आहे. त्यामुळे या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करू नये असंही आमदार परिणय फुके यांनी म्हटलं.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आधी संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. संविधानात काय तरतुदी आहेत ते समजून घेतल्या पाहिजेत. आरक्षण देताना काय काय बाबींचा विचार त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता, कोणत्या समाजाला आरक्षण दिले पाहिजे, कुणाला नाही याचा अभ्यास करून तेव्हाच्या संविधान सभेने संविधानाची रचना केली होती. वेगवेगळ्या जातींना ओबीसीत समाविष्ट केले होते. ज्या प्रमाणे जरांगे पाटील आर्थिक निकषावर आरक्षण मागत आहेत हे चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला EWS मधून आरक्षण दिले आहे. १० टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळाले आहे. EWS चे आरक्षण मराठा समाजासाठी फायदेशीर आहे. २० टक्के मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळणे हा त्यांचा विजय तसाही झाला आहे. ओबीसीत आधीच ३५० जाती आहेत, आरक्षणात अनेक जिल्ह्यात १९ टक्के आरक्षण मिळत नाही. त्यात ३५० जाती आहेत. त्यात आणखी एक ३५१ जात समाविष्ट झाली तर मराठा समाजाला न्याय मिळणार नाही. त्यांनी EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा असं भाजपा आमदार परिणय फुके यांनी सांगितले.