मराठा समाजाचा कार्ला फाटा येथे चक्काजाम

By Admin | Updated: January 31, 2017 18:50 IST2017-01-31T18:50:13+5:302017-01-31T18:50:13+5:30

मराठा समाज नाणेमावळ विभागाच्या वतीने कार्ला फाटा येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर ૪५ मिनिटे चक्काजाम (रास्ता रोको) आंदोलन करण्यात आले.

Maratha community performances at Karla Phata | मराठा समाजाचा कार्ला फाटा येथे चक्काजाम

मराठा समाजाचा कार्ला फाटा येथे चक्काजाम

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 31 - मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी आज सकल मराठा समाज नाणेमावळ विभागाच्या वतीने कार्ला फाटा येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर ૪५ मिनिटे चक्काजाम (रास्ता रोको) आंदोलन करण्यात आले. शांततेच्या मार्गाने हा चक्का जाम करण्यात आला होता.

कार्ला फाटा येथे आयोजकांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला सकाळी ११ वाजता पुष्पहार अर्पण करत उपस्थित समाज बांधवांना चक्काजाम आंदोलनाची आचारसंहिता वाचन करून दाखविण्यात आली. शांततेच्या मार्गाने हे चक्काजाम आंदोलन करत मराठा समाजाच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कारप्रकरणी आरोपींना फाशी व्हावी या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

काही समाज बांधवांनी यावेळी आपली मनोगते व भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले समाजाने महाराष्ट्रात ५७ ठिकाणी शांततेच्या मार्गाने मूकमोर्चे काढत शासनापर्यंत समाजाच्या मागण्या पोहोचविल्या. लाखोंच्या संख्येने समाज बांधव व भगिनी या मूकमोर्चांमध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनांची दखल जगभरात सर्वत्र घेतली गेली. मात्र डोळ्यांवर पट्टी व कानावर हात ठेवलेल्या सरकारने या आंदोलनांची दखल घेतली नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यात वेळकाढूपणा सुरू असल्याने समाजाला आज चक्काजाम सारखे आंदोलन करावे लागले. मात्र समाजाने ते देखील शांततेच्या मार्गाने केले. मराठा समाजाच्या संयमाचा अंत शासनाने पाहू नये, समाजाचा ज्वालामुखी भडकल्यास तो शांत होणार नाही याकरिता शासनाने मराठा समाजाच्या मागण्याची तात्काळ दखल घेत त्या मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तब्बल ૪५ मिनिटे सकल मराठा बांधवांच्या वतीने चक्काजाम करण्यात आल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. दुपारी १२ वाजता राष्ट्रगीताने या चक्का जामची सांगता करण्यात आली. चक्का जाम आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खबरदारी म्हणून लोणावळा ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा बंदोबस्त कार्ला फाटा येथे सकाळपासून तैनात करण्यात आला होता.

Web Title: Maratha community performances at Karla Phata