माओवाद्यांनी पळविल्या वनकर्मचाऱ्यांच्या बंदुका
By Admin | Updated: December 21, 2014 01:45 IST2014-12-21T01:45:33+5:302014-12-21T01:45:33+5:30
जंगलात गस्त घालत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांजवळील तीन एसएलआर बंदुका आणि आठ जिवंत काडतुसे माओवाद्यांनी पळविल्या.

माओवाद्यांनी पळविल्या वनकर्मचाऱ्यांच्या बंदुका
गडचिरोली : जंगलात गस्त घालत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांजवळील तीन एसएलआर बंदुका आणि आठ जिवंत काडतुसे माओवाद्यांनी पळविल्या. ही घटना शनिवारी दुपारी अहेरी तालुक्यातील कोंजेड येथे घडली. या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला असून रात्री उशिरा जिमलगट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिरोंचा वनक्षेत्रात येणाऱ्या देचलीपेठा वनपरिसरातील कोंजेड येथे आज शनिवारी वनविभागाचे कर्मचारी लाकूड तस्करांच्या मागावर होते. दरम्यान कोंजेड जंगलात गस्त घालत असताना लपून बसलेल्या माओवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांंच्या ताब्यातील तीन बंदुका आणि आठ जिवंत काडतुसे पळविली. त्यानंतर हे कर्मचारी जंगलातून सायंकाळी उशिरा जिमलगट्टा येथे पोहोचले. त्यानंतर ते जिमलगट्टा पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदविण्यात आला.
महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या गोदावरी नदीपात्रातून सागवान लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. या तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने वनविभागाला शस्त्रे पुरविली होती. लाकडे वाहून नेताना कुणी दिसत असेल व अडवूनही थांबत नसेल तर शस्त्राचा वापर करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी पोलीस प्रशासनाच्या मदतीने तस्करांवर नजर ठेवून आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसांनी केले होते अलर्ट
गस्तीवर जाण्यापूर्वी वनकर्मचाऱ्यांना शस्त्रे पोलीस ठाण्यातून न्यावी लागतात. त्यामुळे आज दुपारला कोंजेड जंगलात तस्कर असल्याची माहिती मिळताच वनकर्मचारी बंदुका घेण्यासाठी जिमलगट्टा पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी कोंजेड जंगलात माओवादी असल्याचे पोलिसांनी सांगून वनकर्मचाऱ्यांना अलर्ट केले होते.