दारू गाळणाऱ्या हाताने ‘फिनाइल’ निर्मिती
By Admin | Updated: July 31, 2016 03:59 IST2016-07-31T03:59:42+5:302016-07-31T03:59:42+5:30
महिलांना पोलीस विभागाने नवजीवन योजनेंर्गत प्रशिक्षण देत फिनाईल उत्पादकाच्या रूपाने समाजासमोर आणले आहे.

दारू गाळणाऱ्या हाताने ‘फिनाइल’ निर्मिती
रूपेश खैरी,
वर्धा- गावठी दारू गाळणाऱ्या पारधी समाजातील महिलांना पोलीस विभागाने नवजीवन योजनेंर्गत प्रशिक्षण देत फिनाईल उत्पादकाच्या रूपाने समाजासमोर आणले आहे.
चोऱ्या करणारा समाज म्हणून शिक्का असलेल्या पारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. त्यातूनच ‘नवजीवन योजना’ अंमलात आणली.
एक पुरूष व १५ महिलांचा एक बचत गट तयार करण्यात आला. त्याला दुर्गा बचत गट असे नाव देण्यात आले. त्यांना येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले. आता हे बचत गट स्वतंत्रपणे फिनाईलची निमिर्ती करत आहेत. रुग्णालयांसह विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत या बचत गटांचे फिनाईल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दारू गाळणाऱ्या हातांना पोलीस विभागाने प्रतिष्ठित व्यवसायी बनविल्याने वायफड पारधी बेड्यावरील गुन्ह्यांना बऱ्यापैकी आळा बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
>प्रत्येकी पाच हजारांची मदत
फिनाईल बनविण्याच्या प्रशिक्षणानंतर महिलांना व्यवसाय उभारणीकरिता पोलीस विभागाने प्रती सदस्य पाच हजार अशी एकूण ८० हजार रुपयांची मदत केली. यातून प्रारंभी ४० हजार लिटर फिनाईलचे उत्पादन झाले.
पोलिसांनीच केले फिनाइलचे मार्केटिंग
या महिलांनी निर्माण केलेल्या फिनाईलच्या मार्केटींगकरिता पोलिसांनी प्रयत्न केले, ते अजूनही सुरूच आहेत. गुन्ह्याच्या विळख्यात असलेल्या या महिलांना समाजात स्थान मिळवून देण्याकरिता पोलीस विभागाचा लढा कायम आहे.
>इतर महिलांच्या विरोधाने सूत कताई प्रकल्प रखडला
देवळी तालुक्यातील वायफड पारधी बेड्यावरील महिलांनी प्रशिक्षणाअंती बदलविलेल्या मार्गामुळे पोलिसांचीही इच्छा बळावली. पोलिसांनी पांढरकवडा येथील पारधी बेड्यावरील महिलांना सूत कताईचे प्रशिक्षण दिले; मात्र या महिलांना त्यांच्या बेड्यावरील इतर महिलांकडून झालेल्या विरोधामुळे त्यांनी माघार घेतल्याने येथे पोलिसांना अपयश आले.
>आता दारू गाळण्याच्या मार्गावर परतायचे नाही
दारू गाळून त्याच्या विक्रीतून बक्कळ पैसा मिळत होता. मात्र पोलिसांच्या कारवाईचा धाक होताच. पोलिसांनीच दाखविलेल्या व्यवसायामुळे बरे वाटत आहे. डोक्यामागे कोणताही ताप नाही. मुलेही शाळेत जाऊ लागली आहेत. त्यांना पुन्हा गुन्ह्याच्या विळख्यात टाकायचे नाही. व्यवसाय वाढविण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.
यात यश येईलच. अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा दारू गाळण्याच्या व्यवसायत परतायचे नाही, अशा प्रतिक्रिया दुर्गा बचत गटाच्या अध्यक्ष नीता संदीप भोसले व सचिव अक्षिता गजानन चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिल्या.
>पारधी समाजातील महिला आज बचत गटांच्या माध्यमातून फिनाईल निर्मितीचे उत्तम काम करीत आहेत. महिला या व्यवसायात येताच वायफड पारधी बेड्यावरील कारवाईतही घट झाली आहे.
- अंकीत गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा