सरकारनं भानावर यावं, ट्रॅप रचू नये...; मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा ठणकावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 02:24 PM2024-01-18T14:24:05+5:302024-01-18T14:24:43+5:30

मुंबईत आल्यावर माझ्यावर गोळ्या घातल्या तरी माझे विचार मरू देऊ नका हे माझे मराठ्यांना आवाहन आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

Manoj Jarange Patil's warning to the government on Maratha reservation | सरकारनं भानावर यावं, ट्रॅप रचू नये...; मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा ठणकावलं

सरकारनं भानावर यावं, ट्रॅप रचू नये...; मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा ठणकावलं

जालना- गेल्या वर्षभरापासून मराठ्यांनी वाट पाहिली. आमच्या अडीशे तीनशे बांधवांनी आत्महत्या केलीय. आमच्या आई बहिणीच्या कपाळावरील कुंकू पुसलंय. आमच्या माताभगिनींची डोकी फुटलीत. पोरं अडीच महिने रुग्णालयात होती. सरकारनं भानावर यावं. मागच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला गोडी गुलाबीने यावर तोडगा काढावा लागेल. आडमुठ्या भूमिकेत जाल, मुंबईत येऊ देणार नाही. आता मराठे संतापलेत. ५४ लाख लोकांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्या. सरकारनं माझ्यावर ट्रॅप रचलाय, मी त्याला भीत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला ठणकावलं आहे. 

जालनातील अंतरवाली सराटी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज जो मुंबईला येणार आहे त्यांना २० तारखेपासून अंतरवाली सराटी येथून निघायचे. जे येणार नाहीत त्यांनी सर्वांना वाटेला लावण्यासाठी यावे. सगळ्या मराठ्यांनी बाहेर पडावे. सरकार आपल्याला येड्यात काढायला निघालंय. कुणीही उद्रेक, जाळपोळ करू नये. जर कुणी करणार असेल तो आमचा माणूस नाही. घरी कुठल्याही मराठ्यांनी थांबू नये. ताकदीने रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच कोणकोणत्या मंत्र्याने माझ्यावर ट्रॅप रचलाय ते मला माहिती आहे. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कुणी विरोध केला, कुणी नाही केला हे सगळे माहिती आहे. २० जानेवारीच्या आंदोलनात कोणता मंत्री सहभागी होतोय आणि किती लोकांना घेऊन सहभागी होतोय हे बघायचे आहे. जो या आंदोलनाला येणार नाही त्याने लक्षात ठेवावं. ही सगळी मराठ्यांची फसवणूक चालली आहे. मराठवाड्यात एकही मराठा नाही सगळेच कुणबी आहेत. मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे. त्याशिवाय तुमचे माझे जमणार नाही. सरकारच्या आमदार, मंत्र्यावर विश्वास ठेऊ नका. आमच्यात काही असंतुष्ट आत्मे आहेत त्यांना हाताखाली घेतले आहे. लातूर, संभाजीनगर, पुणे याठिकाणचे मंत्री आहे.  मराठ्यात फूट पाडण्यासाठी ट्रॅप रचला जात आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, दीड महिने लोकांनी अर्ज केलेत. अजून प्रमाणपत्रे दिली नाहीत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव माझ्यावर विश्वास ठेऊन आहे. तुमच्याशी मैत्री करायला मी येत नाही. मुंबईत आल्यावर माझ्यावर गोळ्या घातल्या तरी माझे विचार मरू देऊ नका हे माझे मराठ्यांना आवाहन आहे. आंदोलन शांततेत करायचे पण संपूर्ण राज्य बंद दिसले पाहिजे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही. सरकारला ७ महिने वेळ दिला. तुम्ही १ वर्षात काहीच करू शकला नाही. मी जर त्या मंत्र्यांचे नाव घेतले तर त्याचा राजकीय सुपडा साफ होईल. विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. 

Web Title: Manoj Jarange Patil's warning to the government on Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.