मुंबई : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलून त्यांना त्यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि व्हिडिओप्रकरणी शिक्षा दिली जाईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. तथापि त्यांना मंत्रिपदावरून हटवावे की त्यांचे खाते बदलावे याबाबत अजित पवार गटात एकमत झाले नसल्याची माहिती आहे.मंगळवारपर्यंत वाट पाहा असे अजित पवार यांनी म्हटले आहे. या दरम्यान ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करतील. तसेच, कोकाटे यांनाही भेटायला बोलावतील असे सूत्रांनी सांगितले. कोकाटेंची गच्छंती करायची की त्यांचे खाते बदलायचे या बाबत पक्षातच मतभेद आहेत. पक्षातील असे आहेत दोन मतप्रवाहआधी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आता कोकाटे यांनाही काढले तर पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसेल असे एक-दोन ज्येष्ठ नेत्यांना वाटते. कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर रोहित पवार व अन्य विरोधकांच्या दबावाला आपण बळी पडलो असा संदेश जाईल, असाही एक प्रवाह आहे.
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 06:55 IST