मंगलगाण्यांत दंग झाल्या सखी
By Admin | Updated: January 18, 2015 01:29 IST2015-01-18T01:29:15+5:302015-01-18T01:29:15+5:30
महाराष्ट्राच्या संस्कृतीशी समरस झालेल्या लोककला, लोकगीते, नृत्य यांचा अविष्कार ‘मंगलगाणी-दंगलगाणी’ या कार्यक्रमातून सादर झाला. ‘

मंगलगाण्यांत दंग झाल्या सखी
पुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीशी समरस झालेल्या लोककला, लोकगीते, नृत्य यांचा अविष्कार ‘मंगलगाणी-दंगलगाणी’ या कार्यक्रमातून सादर झाला. ‘पसायदान ते कसायदान’ अशी मांडणी करीत, महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, समृद्ध वारसा अशा सांस्कृतिक वैभवाचे दर्शन या कार्यक्रमातून घडविले. त्याला सखींनी उत्स्फूर्त दाद दिली.
लोकमत सखी मंचाच्या नोंदणीच्या निमित्ताने अशोक हांडे यांच्या ‘मंगलगाणी-दंगलगाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खिंवसरा असोसिएट्स हे टायटल स्पॉन्सरर, तर डब्य्ल्यू. एस. बेकर्स आणि संस्कार ग्रुप आॅफ फाउंडेशन असोसिएट स्पॉन्सरर आहे. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांच्या हस्ते अशोक हांडे यांचा सत्कार करण्यात आला.
तुंडुब भरलेल्या नाट्यगृहात ‘ओम नमोजी आद्या...’ने सूरमयी कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वनिचित्रफीत, नृत्य, गीतांमधून, सुमधुर निवेदनातून संस्कृतीचे दर्शन घडविले. पहाटेच्या भूपाळीपासून उत्तररात्री रंगणाऱ्या लावणीचा अनुभव या कार्यक्रमाने दिला. विशेष म्हणजे, अशोक हांडेंच्या मर्मविनोदी निवेदनाने धमाल उडवून दिली. खळखळून हसविले. सखींची मने जिंकली. या कार्यक्रमातून अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविले.
‘मोगरा फुलला...’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी काठी...’, ‘संतभार पंढरीत...’, ‘सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार...’, ‘घनश्याम सुंदरा...’ या गाण्यांनी पहाट झाली. ‘भलगाडी दादा...’ म्हणत ग्रामीण संस्कृतीतील सुगीची कामे सुरू झाली. बळीराजा शेतात राबू लागला. ‘सुरू झालीया पेरणं...’, ‘काठीन् घोंगडं घेऊ द्या, की रं मलाबी जत्रंला येऊ द्या की...’, असे गावगाड्यांचे दर्शन घडविले. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज यांचा कालखंड दाखविण्यात आला. ‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात...’ या गीतातून मराठ्यांच्या शौर्याचे दर्शन घडविले. त्यानंतर मराठी मातीशी एकरूप झालेला मर्दानी पोवाडा, ‘पहिले नमन करितो वंदन...’ ‘गणपती आला आणि नाचवून गेला..’ अशी गीते सादर झाली.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असणारे दशावतार, ‘विंचू चावला, विंचू चावला...’ असे म्हणत एकनाथांचे भारूड, खंडेरायाचा महिमा सांगणारे वाघ्यामुरळी नृत्य सादर झाले. ‘आजी गण नाचला...’ असा तमाशातील गण सादर झाला. गण, गवळण, बतावणी झाली. .....या लावणीवर सखींनी अशरक्ष: शिट्या वाजूवन टाळ्यांचा कडकडाट केला. कृष्ण, मावशी, गवळणी, पेंद्या या तमाशातील फार्स धमाल उडवून दिली. राजकीय भाष्यही केले.
‘नवरा आला वेशीपाशी...’ अशी लग्नसराईत सादर होणारी गीते, ‘डोंगराचे अडून, एक बाई चांद उगवला, चांद उगवला’ हे मालवणी संस्कृतीचे दर्शन घडविले. ‘ने मजसी ने, परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे स्वांतत्र्यवीर सावरकराचे मातृभूमीप्रेमाचे दर्शन घडविणारे गीत झाले . उत्तरार्धात कलावंतांचा सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)
देशात काही ‘मंगल’ घडायचे असेल, ‘दंगल’ घडू द्यायची नसेल, तर ‘मंगलगाणी-दंगलगाणी’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरांत आणि मनामनांत पोहोचायला हवा. भारताचा अभिमान जसा अशोकस्तंभ आहे; तसाच महाराष्ट्राचा अभिमान, सांस्कृतिक ‘अशोक’स्तंभ म्हणजेच चौरंगचे अशोक हांडे आहेत.
- विजय बाविस्कर, संपादक
सखींनी दिली टाळ्यांची दाद
४त्यानंतर ‘एक डोळा हेकना किधर भी देखना...’, हे बायकोवरील गीत, ‘पुरूषांच्या कलियुगाचा आला फेरा, बायको पुढती झुकतो नवरा...’’ असे नवऱ्यावरील गीत हांडे यांनी सादर केले. आजचा पुरूष कसा बैलोबा झालाय, याचे दर्शन घडविले. या गाण्यावर सखींनी सभागृह डोक्यावर घेतले. टाळ्यांची दाद दिली. ‘कलियुगाची झाली भेळ, लावली रताळ आलिया केळं...’ हे गीत सादर करून कलियुगात कसायदान निर्माण झाले आहे, याचे दर्शन घडविले. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...’ या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.