लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : तुळींजच्या मदर वेलंकनी शाळेत मुलांना दाखला दिला जात नसल्याच्या वादातून बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापिका आशा डिसोजा यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना घडली.
मदर वेलंकनी एज्युकेशन ट्रस्टची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. दहावी उत्तीर्ण मुलांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नसल्याचा आरोप काही पालकांनी केला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी मनसे कार्यकर्ते शाळेच्या आवारात शिरले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी अन्य बाहेरील लोकांना हाकलून द्या, असे सांगितले. त्यामुळे मनसे कार्यकर्ते चिडले. ही बाब समजताच आणखी कार्यकर्ते जमा झाले. त्यावरून मनसे कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापनात वाद झाला. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी संचालिका आशा डिसोजा यांना मारहाण केली. मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे तुळींजचे पोलिस निरीक्षक बनकर यांनी सांगितले.
मंगळवारी एक विद्यार्थी दाखला मागण्यासाठी आला होता. त्याला अर्ज घेऊन यायला सांगितल्यावर त्याचे पालक मनसे कार्यकर्त्यांना घेऊन आले. त्यांनी तोडफोड करत मला मारहाणही केली,अशी माहिती मुख्याध्यापिका आशा डिसोजा यांनी दिली.
शाळा प्रशासन दाखले न देता विद्यार्थ्यांची अडवणूक करत होते. त्याची विचारणा करण्यासाठी आम्ही गेलो होतो. मात्र, शाळेचे कर्मचारी अंगावर आले. आमच्यावर चपला उगारून महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली, असे मनसे शहर संघटक रवींद्र पाटेकर यांनी सांगितले.