मालवण येथील पुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटेला जामीन मंजूर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 11, 2025 15:11 IST2025-01-11T15:10:27+5:302025-01-11T15:11:19+5:30

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय 

Malvan statue accident case Jaideep Apte granted bail | मालवण येथील पुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटेला जामीन मंजूर

मालवण येथील पुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटेला जामीन मंजूर

मालवण : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी उच्च न्यायालयाने जयदीप आपटे याला जामीन मंजूर केला आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आता आपटेला कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नसल्यामुळं हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम याप्रकरणी लागू शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

मालवण येथे राजकोट किल्ला परिसरात शिवरायांचा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ मध्ये कोसळला होता. अवघ्या आठ महिन्यांतच पुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. या घटनेनंतर पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचे उघड झाले होते. पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण येथून अटक करण्यात आली होती.

पुतळा कोसळल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील चेतन पाटील या आरोपीला उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच जामीन मंजूर केला होता. आता या प्रकरणातील दुसरा आरोपी जयदीप आपटे यालादेखील मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टात सुनावणीवेळी आपटेचे वकील यांनी, निविदेतील अटीनुसार पुतळ्याच्या बांधकामाकरिता लागणाऱ्या साहित्यासाठी आपटे याने ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

त्यामुळे, पुतळा दुर्घटनाग्रस्त व्हावा, अशी तजवीज याचिकाकर्ता का करेल, असा प्रश्न युक्तिवाद करताना वकिलांनी केला होता. त्याचप्रमाणे, पुतळा कोसळल्यामुळे कोणीही जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद नाही. त्यामुळे याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम लागू केले जाऊ शकत नाही, असा दावाही त्यांनी केला होता.

तज्ज्ञ समितीचा अहवाल कोर्टाने फेटाळला

दरम्यान, या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीच्या गोपनीय अहवाल सरकारी वकिलांनी सुनावणीच्यावेळी न्यायालयात सादर केला होता. तसेच, त्या अहवालाचा दाखला देऊन आपटे याची याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवून आपटेला जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Malvan statue accident case Jaideep Apte granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.