मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 14:54 IST2024-08-28T14:51:26+5:302024-08-28T14:54:32+5:30
"आमचे महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राहत होते. त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता. पण जोरदार वाऱ्याने राज्यपालांची टोपी उडाली असे माझ्या तरी वाचणात आलेले नाही. हा पुतळा पडला कसा?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. आज सर्वपक्षीय नेत्यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यातच, आमचे महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राहत होते. पण जोरदार वाऱ्याने त्यांची टोपी उडाली नाही, मग हा पुतळा पडला कसा?" असा सवाल करत ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
ठाकरे म्हणाले, "महाविकास आघाडीतर्फे सर्जेकोट म्हणजे मालवन येथील पुतळा समुद्रात कोसळला, त्याघटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चामध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही रस्ता आडवून बसले आहेत हे शिवद्रोही आहेत. कारण सांगितले जात आहे की, महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला. हे कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणारे आहे." एवढेच नाही तर, "आमचे महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राहत होते. त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता. पण जोरदार वाऱ्याने राज्यपालांची टोपी उडाली असे माझ्या तरी वाचणात आलेले नाही. हा पुतळा पडला कसा?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
ठाकरे पुढे म्हणाले, "याच्या पलिकडे जाऊन जे गद्दर आहेत, नाव घेऊन बोलायचे झाले तर केसरकर बोलत आहेत. काही वाईट घडलं तर, त्यातून काही चांगलं घडेल कदाचित. हे संतापजनक आहे. यामुळे आम्ही ठरवले आहे की, येणाऱ्या रविवारी म्हणजे एक तारखेला दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून, आम्ही सर्वजन गेट वे ऑफ इंडियाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारला आहे, त्या पुतळ्याजवळ जमणार आहोत आणि या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम तिकडे करणार आहोत."
हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल. तेथे मी असेल, शरद पवार असतील, नाना पटोले असतील, तिन्ही पक्षाचे सर्वप्रमुख नेते असतील, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. त्याच प्रमाणे मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की, आपणदेखील या सर्व सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.