मालवणीतील दारूकांडाचे ९० बळी !

By Admin | Updated: June 21, 2015 03:20 IST2015-06-21T02:23:30+5:302015-06-21T03:20:35+5:30

मालाडच्या मालवणी येथे घडलेल्या दारूकांडातील बळींची संख्या ९० वर गेली असून, आणखी ४० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Maluwani seizure of 91 victims! | मालवणीतील दारूकांडाचे ९० बळी !

मालवणीतील दारूकांडाचे ९० बळी !

विषाचा पेला : मुख्य आरोपी गजाआड, भट्टीचा शोध मात्र सुरूच

मुंबई : मालाडच्या मालवणी येथे घडलेल्या दारूकांडातील बळींची संख्या ९० वर गेली असून, आणखी ४० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेला ७२ तास उलटूनही तीन गुत्त्यांवर दारू पिऊन आजारी पडलेले पालिका रुग्णालयांमध्ये भरती होत आहे. त्यामुळे बळींची संख्या शंभरावर पोहोचेल अशी भीती व्यक्त होत आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेने सलीम मेहबूब शेख ऊर्फ जेंटल (३९) आणि फ्रान्सिस थॉमस डिमेलो (४६) दोन मुख्य आरोपींसह राजू हणमंता पास्कल उर्फ राजू लंगडा (५०), डोनाल्ड रॉॅबर्ट पटेल (४७) आणि गौतम हारटे (३०) अटक केली आहे. पोलीस ही दारु कोणत्या भट्टीवरून या गुत्त्यांवर आली, याचा शोध घेत आहेत.
जेंटल व डिमेलो हे दोघे मुंबईत तयार झालेली किंवा मुंबई बाहेरून आलेली गावठी दारू खरेदी करून मालवणीतील छोट्या-मोठ्या गुत्त्यांवर विकतात. या दोघांनी दारूत मिथेनॉल मिसळले आणि ती पुढे गुत्त्यांवर पाठवली, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. भट्टीत गाळलेली दारू दोन ते तीन टप्प्यांमध्ये मुंबईत येते आणि पुढे गुत्त्यांवर पोहोचते. यादरम्यान दारूची वाहतूक करणारे आणि प्रत्यक्ष दारू गाळणारे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जेंटल, डिमेलोला दारू विकणारा सापडणे महत्वाचे आहे, अशी माहिती मिळते.
या दारूकांडाला जबाबदार धरून उत्पादन शुल्क विभागाने अंधेरी युनिटच्या चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केले. निरीक्षक जगदीश देशमुख, राजेंद्र साळुंखे, शिपाई वर्षा वेंगुर्लेकर, धनाजी साळवी अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री हा निर्णय आयुक्त शामसुंदर शिंदे यांनी घेतला.

दारूकांडाला जबाबदार धरून पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटील यांना निलंबित केले. यासह आणखी सात जणांना निलंबित करण्यात आले. त्यामध्ये एपीआय जगदीश पन्हाळे, फौजदार शंकर घार्गे, मनीषा शिरसाट, हवालदार राम मिलन सिंह, अरुण जाधव, पोलीस नाईक संजय माने, विलास देसाई यांचा सहभाग आहे.

इथाइल अल्कोहोलचा उतारा
शताब्दी रुग्णालयात आतापर्यंत १२४ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. यापैकी १७ जणांचा रुग्णालयात आणण्याआधीच मृत्यू झाला होता. रुग्णालयात उपचार घेत असताना ४१ जणांचा मृत्यू झाला.

सायन, केईएम आणि नायर रुग्णालयात काही रुग्णांना हलवण्यात आले आहे. अत्यंत गंभीर प्रकृती असणाऱ्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, हिमो डायलेसिसवरही ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली आहे.

मालाड मालवणी येथील दारूच्या गुत्त्यावर विषारी दारू प्यायल्यामुळे शकडो लोकांना त्रास होत आहे. मिथाइल अल्कोहोल जास्त प्रमाणात दारूत असल्यामुळे ही दारू प्यायलेल्या लोकांना उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास जाणवत आहे.

मिथाइल अल्कोहोल हे शरीरास अत्यंत हानिकारक असते. किडनीच्या बरोबरीनेच इतर अवयवांना त्याचा त्रास होतो. यावर उपचार करण्यासाठी ‘अ‍ॅण्टिडोट’ पद्धतीचा वापर केला जातो. इथाइल अल्कोहोल डायल्सुट करून दिले जाते. १० टक्के इथाइल अल्कोहोल डायल्युट केल्यावर सलाइनमधून रुग्णांना दिले.

मिथाइल अल्कोहोलमुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. रुग्ण कोमात जाऊ शकतो. हे रोखण्यास डायल्युटेड इथाइल अल्कोहोल वापरले जाते, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

एसीपी, डीसीपीला अभय ?
ज्या ठिकाणी दारूकांड घडले तेथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे रोखण्याची व तपास करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या एसीपी सुधाकर पुजारी यांची मात्र कारवाईतून सुटका झाली. तसेच परिमंडळ ११ची जबाबदारी असलेले डीसीपी विक्रम देशमाने यांच्यावरही कारवाई झालेली नसल्याने पोलीस दलात आश्चर्य व्यक्त होत आहे.

राजीनामा घ्या..
विषारी दारूकांडाला उत्पादन शुल्क विभागाची निष्क्रियता कारणीभूत असल्याने मुख्यमंत्र्यांनी उत्पादन शुल्कमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अवैध धंदे बंद करण्यासाठी राज्य सरकारला आणखी किती बळी हवेत. दारुकांडामुळे अवैध धंद्याला चाप लावण्यासाठी पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

Web Title: Maluwani seizure of 91 victims!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.