माळीण दुर्घटना : दिवाळीमध्ये नवीन घरात !

By Admin | Updated: July 30, 2016 05:08 IST2016-07-30T05:08:19+5:302016-07-30T05:08:19+5:30

निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैैवी माळीणच्या घटनेला दि. ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. शासनाकडून तसेच सेवाभावी संस्थांकडून या गावाला

Malin Accident: New house in Diwali! | माळीण दुर्घटना : दिवाळीमध्ये नवीन घरात !

माळीण दुर्घटना : दिवाळीमध्ये नवीन घरात !

- निलेश काण्णव,  घोडेगाव

निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैैवी माळीणच्या घटनेला दि. ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. शासनाकडून तसेच सेवाभावी संस्थांकडून या गावाला आर्थिक व वस्तुरूपी खूप मदत मिळली, मात्र कायमस्वरूपी पुनर्वसन अजूनही झालेले नाही. एका वर्षात पक्की घरे बांधून देऊ, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते; मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही. सध्या नवीन माळीण गाव उभारण्याचे काम सुरू असून, दिवाळीपर्यंत घरे ताब्यात दिली जातील, असे प्रशासनाकडून सांगितले जाते.
माळीण दुर्घटनेत ४० कुटुंबातील १५१ लोक ढिगाऱ्याखाली सापडून मयत झाले. यातील ९ लोक जखमी अवस्थेत सापडले, तर ३८ लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले. शासनाकडून मयतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे ८.५० लाख रुपये देण्यात आले व विविध योजनांमधून मदत करण्यात आली. दुर्घटना घडल्याबरोबर दोन महिन्यांत माळीण फाट्यावर तात्पुरती शेड उभारून येथे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. कायमस्वरूपी पुनर्वसन एक वर्षात करून देण्याचे आश्वसन देण्यात आले होते. मात्र कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागा मिळण्यास वेळ गेल्याने हे काम लवकर सुरू होऊ शकले नाही.
जागा शोधमोहीम सुमारे सव्वा वर्ष चालली. प्रथम अडिवरे, कोकणेवाडी, झांजरेवाडी, कशाळवाडी, चिंचेचीवडी या पाच जागा पाहण्यात आल्या; मात्र वेगवेगळ्या अडचणींमुळे या जागह रद्द झाल्या. शेवटी नव्याने आमडेची जागा पाहण्यात आली व या जागेला ग्रामस्थ, जीएसआर अशा सर्वांनीच होकार दिला. सध्या या आठ एकर जागेवर नवीन गाव वसवण्याचे काम सुरू आहे. पावसाळा असल्यामुळे हे बंद असले, तरी दिवाळीपूर्वी घरांची कामे पूर्ण करून लोकांना ताबा दिला जाणार असल्याचे प्रशासन सांगत आहे.
या नवीन गावात ६७ घरे बांधण्यात येणार असून, सर्व बारा मूलभूत सेवासुविधा दिल्या जाणार आहेत. सध्या १२ घरांची कामे पूर्ण झाली आहेत, तसेच गुरांचा गोठा, ग्रामपंचायत व तलाठी इमारत ही कामेदेखील पूर्ण झाली आहेत. तसेच दुर्घटना घडलेल्या ठिकाणी स्मृतिवनाचे कामदेखील सुरू आहे. पावसामुळे येथे काम करणे अशक्य झाल्यामुळे पुनर्वसनाचे काम बंद आहे.



-माळीण दुर्घटनेतून वाचलेल्या १६ अंशत: बाधित कुटुंबांचे प्रचंड हाल झाले. शासनाने मयत कुटुंबीयांच्या वारसांना भरघोस मदत केली. मात्र अंशत: बाधित कुटुंबांना काहीच मदत दिली नाही.
-पुरेशी तात्पुरती निवारा शेडही मिळाली नाही, त्यांच्या घरांमध्ये चोऱ्या झाल्या, दुर्घटनेतून वाचलेली जनावरे बांधण्यास जागा मिळाली नाही. त्यामुळे आजही काही कुटुंबे दुसऱ्याच्या घरांमध्ये राहून दिवस काढत आहेत.

सध्या माळीण ग्रामस्थ माळीण फाट्यावरील तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहात आहेत. ही पत्र्याची शेड १२५ चौरस फुटाची असून, या तोकड्या जागेत अनेक गैरसोर्इंना तोंड द्यावे लागत आहे.
पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरू नये म्हणून ग्रामस्थांनी घरांच्या पुढे साधे लाकूड, पत्रा व प्लॅस्टिक कागदांचे शेड ओढली आहे.
येथे प्यायला पाणी नसल्याने महिला हपश्यावरून पाणी वाहात आहेत. या छोट्याशा घरांमध्ये राहून वैतागलेले ग्रामस्थही नवीन घरांची वाट पाहात आहेत.

माळीण दुर्घटनेतील नातेवाइकांची रजा मंजूर करण्यात येईल असे माळीण दुर्घटनेला भेट देणाऱ्या प्रत्येक नेत्याने आश्वासन दिले होते. मात्र अजूनही काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर झाल्या नाहीत.
माळीण ग्रामस्थांनी दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम ठेवला आहे. या दिवशी सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मान्यवर जमून मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

माळीणसारख्या दुर्घटना राज्यात कुठेही उद्भवू शकतात. मात्र अद्यापदेखील याबाबत शासनाने धोरण ठरवले नाही. पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर दरड कोसळल्यामुळे या वर्षी अनेक वेळा मार्ग बंद पडल्याच्या घटना घडल्या. सतत वाहनांची गर्र्दी असलेल्या या मार्गावर अशा दुर्घटना घडूनही शासन जागे होत नाही. राज्यात अनेक गावे धोकाग्रस्त स्थितीत डोंगरामध्ये वसलेली आहेत. त्यांचे भवितव्य अधांतरीच आहे. माळीण दुर्घटनेमधून बोध घेऊन शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत.
- देवदत्त निकम

माळीण दुर्घटनेत १५१ लोकांना निसर्गाच्या रौद्र रूपापुढे जीव गमवावा लागला. मात्र यातूनही रुद्र तीन महिन्यांचा मुलगा वाचला. रुद्र या चिमुकल्या बालकाने रडून मदतकार्यासाठी आलेल्या गावकऱ्यांंना जागे केले. यामुळे त्याची आई, आजी, आजोबा वाचले. हा रुद्र आता दोन वर्षे व तीन महिन्यांचा झाला आहे. मुलगा नशिबवान असल्यामुळे एवढ्या भयंकर दुर्घटनेतून वाचलो असल्याचा आनंद आजही त्याची आई प्रमिला मच्छिंद्र लेंभे हिला आहे.
- प्रमिला मच्छिंद्र लेंभे

माळीण दुर्घटनेच्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्याच्या फोनवर सर्वात पहिला फोन आला. माळीण गावावर दरड कोसळून गाव गाडला गेला. परंतु हे खरे वाटले नाही, याची शहानिशा होत नव्हती. म्हणून आम्ही तीन ते चार पोलिसांनी गाडी काढली व घटनेच्या ठिकाणी पोहोचलो. अनेक वेळा कामाच्या माध्यमातून या गावात जाण्याचा योग आला होता. परंतु ज्या वेळी ढिगारा पाहिला तेव्हा विश्वासच बसत नव्हता. मात्र समोर निर्माण झालेली परिस्थिती पाहून रात्रंदिवस काम केले. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी टीम तयार केली. आलेल्या नातेवाइकांना आधार देण्याचे काम केले. आज दोन वर्षांनंतर त्या वेळच्या आठवणी आठवल्या तरी अंगावर शहारे येतात.
- राजेंद्र हिले, पोलीस शिपाई

माळीण दुर्घटनेतून जिवंत माणसे काढू शकलो नाही, याचे शल्य आजही वाटते. मात्र त्या वेळची तेथील परिस्थिती पडणारा पाऊस, चिखलामुळे ढिगाऱ्यातून जिवंत माणसे बाहेर निघणे अवघड होते. मात्र यातून मृतदेह बाहेर काढून नातेवाइकांना दाखवणे व त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सलग आठ दिवस रात्रंदिवस काम केले. हा ढिगारा उपसण्यासाठी लागणाऱ्या सर्व मशिनरी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध केल्या. तसेच या मशिनरींचे आॅपरेटर, त्यांचे जेवण याकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागत होते. बरोबर काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे मृतदेह बाहेर काढण्याचे काम लवकरात लवकर संपवू शकलो.
- एस. बी. देवढे
सार्वजनिक बांधकाम उपअभियंता

तो दिवस कधीही न विसरणारा. लहानपणी मी व माझे मित्र मारुतीच्या मंदिराच्या पटांगणात गावातून वाहत येणाऱ्या पाण्यावर चिखलाने व दगडांनी छोटेसे धरण बांधायचो व यात पाणी अडवायचो आणि एकदम ते छोटेसे धरण फोडून द्यायचो. ते फुटलेले धरण पाहताना खूप मजा यायची, मात्र हाच पाऊस माझ्या मित्रांना घेऊन जाईल, असे कधी वाटले नव्हते. सध्या नवीन जागेवर घरे बांधण्याचे काम सुरू आहे. ही घरे खूप चांगली आहेत. पण खरंच सांगतो, आमची जुनी घरं कच्ची होती, मातीची, दगडांची होती, पण संदेश देणारी होती. पण नाईलाजास्तव आज जुने गाव सोडून नवीन घरांमध्ये जावे लागणार आहे.
- विजय लेंभे, ग्रामस्थ व शिक्षक

Web Title: Malin Accident: New house in Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.