एकतर्फी प्रेमातून तरुणाचा स्वतःच्याच अपहरणाचा बनाव
By Admin | Updated: February 11, 2017 23:11 IST2017-02-11T23:11:06+5:302017-02-11T23:11:06+5:30
तरुणीने प्रेमाला नकार दिल्यामुळे नैराश्यामधून तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणाचा स्वतःच्याच अपहरणाचा बनाव
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 11 - तरुणीने प्रेमाला नकार दिल्यामुळे नैराश्यामधून तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. एकतर्फी प्रेमामधून या तरुणाने केलेल्या कृत्यामुळे पोलिसांची मात्र दोन दिवसात धांदल उडाली होती.
अविनाश देवराम वैरागर असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाशचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने या मुलीला त्याबद्दल विचारले होते. तिने नकार दिल्यामुळे त्याला नैराश्य आले. या नैराश्यापोटी तसेच संबंधित मुलीला त्रास व्हावा यासाठी त्याने अपहरणाचा बनाव रचला.
त्याने गुरुवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास मित्र रविंद्र चव्हाण आणि अन्य मित्रांना मोबाईलवर फोन केला. त्याचे कोणीतरी अपहरण केले असून मारहाण करीत असल्याचा तसेच जोरजोरात रडत असल्याचा आवाजही मोबाईलवर काढला. ही बाब चव्हाण याने त्याच्या आईला सांगितली.
त्याची आई लता यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. अविनाशच्या मोबाइलचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करुन त्याचे टॉवर लोकेशन घेण्यात आले. त्यानुसार, विमाननगर, पुणे रेल्वे स्थानक, खराडी, उरुळी कांचन आदी भागात त्याचे लोकेशन मिळत होते. त्या त्या ठिकाणी पोलीस पोहोचत होते. दरम्यान तो पुणे रेल्वे स्थानकावर असल्याचे समजताच त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अपहरणाबाबत चौकशी केली असता त्याने बनाव रचल्याची कबुली दिली.