मैत्रेय कंपनीने केली साडेचार कोटीची फसवणूक
By Admin | Updated: August 4, 2016 20:32 IST2016-08-04T20:32:34+5:302016-08-04T20:32:34+5:30
मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्लॉट खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला.

मैत्रेय कंपनीने केली साडेचार कोटीची फसवणूक
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ४ : मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्लॉट खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. पोलिसांनी कंपनीच्या संचालकांवरसुद्धा गुन्हा दाखल केल्यानंतर गुरुवारी अनेक गुंतवणूकदार पुढे आले. त्यांनी कंपनीने शहरातील आठशेच्यावर गुंतवणूकदारांची तब्बल साडेचार कोटी रुपयांच्यावर फसवणूक केल्याचा दावा काही गुंतवणूकदारांनी केला.
सहा वर्षांपूर्वी मैत्रेय कंपनीने अकोल्यात शाखा शाखा उघडली. कार्यालय थाटले. शेगाव येथील अशोक बैस नामक व्यक्तीला शाखा व्यवस्थापक म्हणून येथे बसविले. अशोक बैस व त्याच्या काही कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नियोजनानुसार प्लॉट खरेदीच्या नावाखाली आकर्षक योजना बाजारात आणल्या. ५0 हजार, ५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून प्लॉटचे मालक व्हा, असे आमिष दाखविण्यात आले. तसेच विमा योजनासुद्धा राबविण्यात आली. कंपनीने त्यासाठी शहरातील ठिकठिकाणी हॉटेल्समध्ये इच्छुक गुंतवणूकदारांसाठी बैठक आयोजित केल्या.
बैठकांमध्ये कंपनीचे संचालक जनार्दन परूळेकर, वर्षा सत्पाळकर यांनीही गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करून कंपनीच्या आकर्षक आणि लाभदायी योजनांची माहिती दिली. गुंतवणूक केल्यास तुम्हाला डबल बेनिफिट होईल. अशा भूलथापाही देण्यात आल्या. प्रत्येक जण घर व्हावे असे स्वप्न बाळगून असतो आणि आपल्याकडील रकमेची योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास योग्य व्याज, तिप्पट रक्कम मिळेल, अशी आशा वाटते. त्यामुळे शहरातील आठशेच्यावर गुंतवणूकदारांनी आपल्या आयुष्यासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी जमविलेल्या पुंजीची रक्कम कंपनीमध्ये गुंतविली. गुंतविलेल्या रकमेची मुदत पूर्ण झाली. आता प्लॉट मिळेल, दुप्पट, तिप्पट रक्कम मिळेल. या आशेने गुंतवणूकदार कंपनीच्या कार्यालयात गेले. त्यांना धनादेश देण्यात आले.
अनेक गुंतवणूकरांनी हे धनादेश बँकेत वटविण्यासाठी दिले; परंतु धनादेश न वटताच परत आले. त्यामुळे सर्वांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली; परंतु या ठिकाणी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गुंतवणूकदारांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना ३00 गुंतवणूकदारांची यादी देण्यात आली; परंतु काही गुंतवणूकदारांंनी यात शहरातील आठशेच्यावर संख्या असल्याचा दावा केला.