महायुतीचा पुन्हा गोंधळ
By Admin | Updated: May 20, 2014 04:30 IST2014-05-20T04:30:12+5:302014-05-20T04:30:12+5:30
भाजपा-शिवसेना युतीने सुनावणीत गोंधळ घालत सुनावणी पुन्हा बंद पाडली.

महायुतीचा पुन्हा गोंधळ
पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित विकास आराखड्यावरील (डीपी) सुनावणीत पारदर्शकता नसल्याने, तसेच ती नियोजनबद्ध पद्धतीने होत नसल्याचा आरोप करीत भाजपा-शिवसेना युतीने आज या सुनावणीत गोंधळ घालत सुनावणी पुन्हा बंद पाडली. दरम्यान, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या गोंधळाचा फटका मात्र सुनावणीसाठी उपस्थित राहिलेल्या पुणेकरांना सहन करावा लागला. या आराखड्यावर घेण्यात आलेल्या हरकती-सूचनांवर ५ मेपासून सुनावणीला सुरुवात केली होती. मात्र, सुनावणीसाठी नागरिकांना वेळेत नोटिसा मिळाल्या नसल्याचा आरोप करीत शिवसेना-भाजपाने ही सुनावणी पहिल्याच दिवशी उधळून लावली. त्यानंतर १८ मेपर्र्यंत सुनावणी स्थगित केली होती. आज पुन्हा ही सुनावणी घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. त्यानुसार नागरिकांना नोटिसा देऊन सुनावणीसाठी अर्धा तास आधी उपस्थित राहण्यास सांगितले होते. सकाळी दहापासून ही प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, भाजपा-सेनेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी या सुनावणीला विरोध करीत महापालिका भवनासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास सुनावणी सुरू असलेल्या महापालिकेच्या वडके सभागृहात जाऊन नियोजन समितीच्या सदस्यांना घेराव घातला आणि सुनावणी बंद पाडली. या गोंधळामुळे सुनावणी दोनपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे समिती सदस्य अॅड. अभय छाजेड यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले. त्यानंतरही मात्र भाजपचे आमदार गिरीश बापट, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर त्यांच्यासह पदाधिकार्यांनी पुन्हा ही सुनावणी रोखून धरली. तसेच, वडके सभागृहाबाहेरच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनकर्ते आणि समिती सदस्यांमध्ये जवळपास दीड तास बैठक सुरू होती. तोपर्यंत सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांना काहीही न सांगता बसवून ठेवण्यात आले. अखेर पाचच्या सुमारास या नागरिकांना आज सुनावणी होणार नसून उद्या (मंगळवारी) दुपारी ३ नंतर सुनावणीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. त्यामुळे सुनावणीसाठी आलेले नागरिक चांगलेच संतप्त झाले होते. दरम्यान, या प्रकारानंतर भाजपाच्या पदाधिकार्यांनी या नागरिकांची माफी मागितली़ मात्र, सकाळपासून अन्न पाण्याविना राहावे लागल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.