महावितरण: 14 लाख वीज मीटर खराब, 4% भरतात वापरापेक्षा जादा पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 06:45 IST2022-12-13T06:45:24+5:302022-12-13T06:45:56+5:30
कारवाईनंतरही नोव्हेंबरमध्ये ६.९ टक्के रीडिंग चुकीचे

महावितरण: 14 लाख वीज मीटर खराब, 4% भरतात वापरापेक्षा जादा पैसे
- कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील १४ लाख ८६ हजार ३११ ग्राहकांचे वीज मीटर ‘फॉल्टी’ (खराब) आहेत. ६.९% रीडिंग सदोष आढळून आले आहेत. तसेच ४ टक्के ग्राहकांना सरासरी बिल पाठवले जात आहे. त्यांना वापरापेक्षा अधिक बिल भरावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती बिघडल्याचा हवाला महावितरणतर्फे दिला जात असला तरी या प्रकारातून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे दिसून येते.
अचूक मीटर रीडिंगबाबत महावितरणने कठोर भूमिका घेतली. अनेक मीटर रीडिंग एजन्सींना निलंबित करण्यात आले; परंतु त्याचा परिणाम मात्र झाला नाही. नोव्हेंबर महिन्यातसुद्धा ६.९ टक्के रीडिंग चुकीचे आढळून आले. ऑक्टोबरमध्ये ही संख्या ७.२ टक्के होती. जून महिन्यातही इतकीच टक्केवारी होती. राज्यभरात ४ टक्के ग्राहकांना सरासरी बिल दिले जात आहे.
सरासरी मागील तीन महिन्यांच्या रीडिंगच्या आधारावर निश्चित केली जाते. तो काळ उन्हाळ्याचा होता. त्यामुळे स्वाभाविकपणे हिवाळ्यातही ग्राहकांना अधिक वापराचे बिल भरावे लागत आहे.
मीटर बदलण्यास सुरुवात : महावितरण
महावितरणचे अधिकारी यासंदर्भात काहीही बोलायला तयार नाही. कंपनीतील सूत्रानुसार, कंपनीकडे आता मीटरची टंचाईसुद्धा नाही. त्यामुळे फॉल्टी मीटर बदलण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. कंपनी सरासरी बिल बंद करण्याच्या प्रयत्नात असून, रीडिंगमधील चुकीबाबतही गंभीर आहे.
तपासाची कूर्मगती
हे मीटर चुकीचे रीडिंग दाखवतात. कंपनीला याची माहिती असूनही केवळ २.२ टक्के म्हणजे ३२,२६९ वीज मीटरचाच आढावा घेण्यात आला. तपासात केवळ २,८५९ मीटर व्यवस्थित आढळून आले.