राज्यातील महावितरणची कार्यालये होणार 'पेपरलेस'
By Admin | Updated: May 28, 2015 01:13 IST2015-05-28T01:07:48+5:302015-05-28T01:13:13+5:30
जूनअखेर कार्यान्वित : कामे गतिमान होऊन पारदर्शकता वाढणार--- शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण कोल्हापूर परिमंडल.

राज्यातील महावितरणची कार्यालये होणार 'पेपरलेस'
शेखर धोंगडे - कोल्हापूर
राज्यातील महावितरण कंपनीच्या १४ परिमंडल विभागांतील सर्व शाखा विभागापासून ते मुख्य कार्यालयापर्यंतचे विभाग हे आता पेपरलेस होणार आहेत. त्यामुळे कागद व फायलिंगचा ढिगारा कमी झाल्याचे चित्र जूनच्या अखेरपर्यंत पाहावयास मिळेल.
राज्यभर पसरलेल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नरत असलेलीे महावितरण कंपनी आता अंतर्गत विभागातही अधिक अचूक, पारदर्शक राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचेच एक पाऊल म्हणून ई.आर.पी. (इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) अंतर्गत प्रशासनाची सर्व कामे कागदाऐवजी संगणकाद्वारे केली जाणार आहेत. परिणामी, राज्यात विखुरलेल्या माहितीचे सनियंत्रण व सुव्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येणार आहे.
पाच महिन्यांपासून सर्व विभागांमध्ये पेपरलेस आॅफिसची संकल्पना राबविण्याची मोहीम अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यातून विश्वासार्हता, कामात गती व पारदर्शकता येण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर गैरकारभाराला देखील आळा बसेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रशासकीय यंत्रणेच्या व्यवस्थापनातील ई.आर.पी. ही सुंदर पद्धत असून याच माध्यमातून दोन महिन्यापासून ठेकेदांराची बिलंही अदा केली आहेत. यातून पारदर्शकता व अचूकता वाढणार असून ७० टक्क्क्यांपेक्षा अधिक काम याचे पूर्ण झाले आहे. उर्वरित व्यवस्थापनाची माहिती संगणकावर घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वांचेच नियंत्रण यावर राहणार आहे.
- शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण कोल्हापूर परिमंडल.
ई.आर.पी. अंतर्गत सारे काही संगणकावरच
प्रशासकीय सेवेत राज्यस्तरावर काही मुख्य व मोठ्या शासकीय यंत्रणेत पेपरलेस व्यवस्था सुरू झाली असून, त्या यादीत आता लवकरच महावितरणचा विभागही जाईल. यामुळे राज्यातील माहितीचे सनियंत्रण व सुव्यवस्थापन प्रभावीपणे करता येईल. यामध्ये कर्मचाऱ्यांची बिलं काढणे, आॅनलाईन गोपनीय अहवाल सादर करणे, वित्तीय व्यवहार व त्यावर नियंत्रण ठेवणे, प्रकल्प व्यवस्था पाहणे, यंत्रसामग्री व्यवस्थापन, सयंत्र देखभाल व दुरुस्ती, इत्यादी मॉड्यूलचा या ई.आर.पी.त समावेश केला आहे.
ठेकेदारांचीही बिलं आॅनलाईनच
ठेकेदारांची बिलं देखील आॅनलाईनच काढली जाणार आहेत. यामुळे पारदर्शकतेबरोबरच चांगली ग्राहक सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना याचा अधिकतर खूप उपयोग होईल. यातून विश्वासार्हता वाढून कामांना गती येईल.
राज्यातील कामाची संपूर्ण माहिती ‘एकाच क्लिक’वर
बहुतांश कर्मचारी संगणकावर काम करत असल्याने मिळणार फायदा.
चॅम्पियन नावाच्या स्वतंत्र यंत्रणेने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे.
सुटी टाकणे, पगार बिलं देणे, अशीही कामे संगणकावर होतील.
कागदांवरील खर्च, फायलींचा ढिगारा कमी होण्यास मदत मिळेल.
कोल्हापूर जिल्ह्यातील ६ हजार अधिकारी, कर्मचारीवर्ग आता 'आॅन लाईन' वर अंतर्गत व्यवस्थापनाचे काम करणार.