थकबाकी हटवण्यासाठी महावितरणला लाभला 'नवप्रकाश'

By Admin | Updated: January 21, 2017 01:21 IST2017-01-21T01:21:54+5:302017-01-21T01:21:54+5:30

ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने सुरू केलेल्या नवप्रकाश योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

Mahavitaran gains 'Innocence' to remove dues | थकबाकी हटवण्यासाठी महावितरणला लाभला 'नवप्रकाश'

थकबाकी हटवण्यासाठी महावितरणला लाभला 'नवप्रकाश'


बारामती : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने सुरू केलेल्या नवप्रकाश योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या योजनेत आतापर्यंत बारामती परिमंडलातील १९ हजार १४६ ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी ७ कोटी ३६ लाख ६६ हजार रुपयांची थकबाकी भरली आहे.
महावितरणने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या लघुदाब व उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांसाठी नोव्हेंबर महिन्यापासून नवप्रकाश योजना सुरू केली आहे. येत्या एप्रिल २०१७ पर्यंत मुदत असलेल्या या योजनेतून थकबाकीमुक्तीची व विनाशुल्क नवीन वीजजोडणीची संधी थकबाकीदारांसाठी उपलब्ध झालेली आहे. नवप्रकाश योजनेत ३१ जानेवारी २०१७ पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तसेच १ फेब्रुवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ पर्यंत मूळ थकबाकीसोबत २५ टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार असून, उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होईल.
या योजनेत आतापर्यंत बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यांतील ४ हजार ४६४ वीजग्राहकांनी २ कोटी ५९ लाख ६ हजार रुपये, सातारा मंडलातील ४ हजार ५४४ वीजग्राहकांनी ८१ लाख ५६ हजार रुपये, तर सोलापूर मंडलातील १० हजार १३८ वीजग्राहकांनी ३ कोटी ९६ लाख ४ हजार रुपयांची मूळ थकबाकी भरली आहे. त्यांना या योजनेनुसार व्याज तसेच विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकाचा तपशील व नवप्रकाश योजनेत किती रक्कम भरायची, याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
थकबाकीची रक्कम धनादेशाद्वारेही स्वीकारली जाणार आहे. थकबाकीमुक्त वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीजजोडणी देण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे.
तथापि, सुरक्षा ठेवीची रक्कम वर्षभराच्या वीजवापरानुसार आर्थिक वर्षात आकारण्यात येणार आहे. थकीत देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांनी थकबाकीमुक्त होण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा आणि महावितरणच्या संबंधित शाखा वा उपविभाग कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
>कृषिपंप ग्राहकांनाही होणार लाभ : दरम्यान, या योजनेत आता कृषिपंपधारक ग्राहकांचा व न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर झालेल्या विशिष्ट प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांना सहभागी होता येणार आहे. याशिवाय, न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर होऊन १२ वर्षे झाली असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येईल. नवप्रकाश योजनेत सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळता उर्वरित सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
>बारामती परिमंडलातील
19146
ग्राहकांचा सहभाग
>मूळ थकबाकी भरल्यास

100
टक्के रक्कम माफ
थकबाकीची रक्कम धनादेशाद्वारेही स्वीकारली जाणार आहे. थकबाकीमुक्त वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीजजोडणी देण्यात येईल.

Web Title: Mahavitaran gains 'Innocence' to remove dues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.