महात्मा फुले यांची पगडी आयुष्यातील सर्वोच्च मानबिंदू
By Admin | Updated: April 12, 2015 00:39 IST2015-04-12T00:39:18+5:302015-04-12T00:39:18+5:30
पगडी डोक्यावर ठेवणे म्हणजे एका अर्थाने प्रकाश पाडणे. अनेक पगड्या डोक्यावर असतात किंवा त्या दुसऱ्याच्या डोक्यावर घातल्या जातात.

महात्मा फुले यांची पगडी आयुष्यातील सर्वोच्च मानबिंदू
पुणे : पगडी डोक्यावर ठेवणे म्हणजे एका अर्थाने प्रकाश पाडणे. अनेक पगड्या डोक्यावर असतात किंवा त्या दुसऱ्याच्या डोक्यावर घातल्या जातात. आता पगड्या डोक्यावर ठेवण्याचा जणू धंदाच झाला आहे. पण महात्मा फुले यांच्या पगडीला एक विशिष्ट अर्थ आहे, त्यांची पगडी हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च मानबिंदू असल्याची भावना प्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक अतुल पेठे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने अतुल पेठे यांना ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पहिला ‘सत्यशोधक’ पुरस्कार देऊन आणि महात्मा फुले यांची पगडी अर्पण करून सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरी नरके, रोहिणी पेठे, कामगारनेत्या मुक्ता मनोहर, युनियनचे अध्यक्ष उदय भट आणि युनियनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण असून, जीवन सार्थक झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगून पेठे म्हणाले, खूप वर्षांपूर्वी एसीझेडवर ‘अराजकाची नांदी’ हा माहितीपट बनविला आणि त्यातून सर्वसामान्यांचे प्रश्न कॅमेऱ्याच्या कॅनव्हासमधूनसुद्धा समोर आणता येतात, याची प्रचिती आली.
विकासाचा डांगोरा विवेकाच्या वृत्तीमधून पिटला जात शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जातात, तेव्हा शेतकऱ्यांची अवस्था बांडगुळासारखी होते, हे जवळून पाहता आले. पण विकास झाला का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला. ‘कचराकुंडी’ मधून सफाई कामगारांच्या जीवनाचा वेध घेताना मी नक्की कुठे जगतो आहे, हा प्रश्न मला पडला. कॅमेऱ्यातून त्यांचे जीवन टिपताना मी स्वत:लाच त्यामध्ये पाहायला लागलो. त्यातून माझे आयुष्यच बदलले. ‘सत्यशोधक’ नाटकाद्वारे डोक्यावरून मैला वाहणाऱ्या सफाई कामगारांच्या माथ्यावर सांस्कृतिकतेचे नवे आयाम वसले. हा वास्तववाद जवळून पाहिल्यानंतर आज माझी ओळख नव्याने लोकांना सांगतो. माझे वडील महात्मा फुले, आई सावित्रीबाई फुले, काका महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे त्यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. नव्या काळात युनियन मोडकळीस येणार असून, मूठ तोडून विभाजन कसे करायचे याचे राजकारण होणार आहे. मात्र विचलित न होता त्याविरूद्ध लढायचे कसे? याचा विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
जगातील सर्वच क्रांत्या या सामाजिक आणि सांस्कृतिक पायावर उभ्या राहिल्या आहेत. भारतीय क्रांतीचे प्रेरणास्थान हे महात्मा ज्योतिबा फुले होते. मात्र गेल्या 50 वर्षात आपला देश माकर््स-फुले-शाहू-आंबेडकरांच्या परंपरेला मुकला असून, देशाच्या इतिहासाची मीमांसा योग्यरितीने झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘सत्यशोधक’ हे नाटक अन्य प्रादेशिक भाषांमध्ये व्हावे आणि भारतातील सर्व साहित्यिक आणि कलावंत यांना एकत्र आणून त्यांचे संमेलन भरविले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
- रावसाहेब कसबे
कन्नड भाषेत ‘सत्यशोधक’ येणार?
४कर्नाटकातील हेगडू या गावातील जन गण मन दाता संस्था ‘ सत्यशोधक’ हे नाटक कन्नड भाषेत करू इच्छित आहे, त्यासाठी त्यांचे मला आमंत्रण आले असून, महात्मा फुले नव्याने मांडता येतील का? हे पहायचे आहे असे सांगत आपल्या पुरस्काराची रक्कम या संस्थेला प्रदान करीत असल्याचे अतुल पेठे यांनी जाहीर केले.