VIDEO: फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा 'माऊलीं'च्या शब्दांत समाचार; वाचून दाखवलं भारुड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 03:21 PM2019-12-18T15:21:26+5:302019-12-18T15:27:27+5:30

तीन पक्षांच्या सरकारवर फडणवीसांचं माऊलींच्या शब्दांत टीकास्त्र 

maharashtra winter session bjp leader devendra fadnavis slams uddhav thackeray government | VIDEO: फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा 'माऊलीं'च्या शब्दांत समाचार; वाचून दाखवलं भारुड

VIDEO: फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा 'माऊलीं'च्या शब्दांत समाचार; वाचून दाखवलं भारुड

Next

नागपूर: संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भारुडाचा आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीसांनी ज्ञानेश्वरांचं भारुड वाचून दाखवलं. तीन जणांची उडणारी त्रेधातिरपीट यावर आधारित भारुड वाचत फडणवीसांनी तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. या सरकारमध्ये 'त्रिशंकू'चा नवीन अर्थ समजला. त्रिशंकू म्हणजे तीन पक्ष एकमेकांवर शंका घेणारे, असा चिमटादेखील फडणवीसांनी काढला. 



राज्यपालांच्या अभिभाषणातून सरकारची दिशा स्पष्ट होत नाही. भिन्न विचारधारेचे पक्ष भविष्यात कसं सरकार चालवणार हे त्यातून दिसून येतं, असं म्हणत फडणवीसांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या. जनादेश आमच्या बाजूनं आहे. हे राजकीय स्वार्थानं तयार झालेलं सरकार आहे. ते जनतेच्या मनातलं सरकार नाही, अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आदरपूर्वक उल्लेख करत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही कुठेही असलो आणि ते कुठेही असले तरी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी दैवताच्या ठिकाणीच राहतील. पण, बाळासाहेबांना सेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द देताना, तो काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या मदतीनं करण्याचा दिला होता का?, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. 



राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेने चुका केल्या, तर त्याच्यामागे तत्वज्ञान उभं करण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरुन फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळावा. आश्वासनं स्वत:च्या भरवशावर द्यायची असतात आणि स्वत:च्याच भरवशावर पाळायची असतात, असा टोला फडणवीसांनी लगावला. 



राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादीनं फडणवीस सरकारच्या कारभारावर टीका केली होती. त्या टीकेलादेखील फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. राज्याची आर्थिक स्थिती ठीक नाही, असं सांगून 'कव्हर फायरिंग'चा प्रयत्न होत आहे. आमच्या सरकारनं घेतलेल्या सर्व निर्णयांमध्ये शिवसेना सोबत होती. आता ते चूक होते, हे शिवसेनेकडून वदवून घेण्याचं काम काँग्रेस-राष्ट्रवादी करणार आहे, असं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं. राज्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे. सर्व निकषांमध्ये राज्याची आर्थिक स्थिती आता अधिक चांगली आहे आणि हे मी नाही, तर राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो, असंदखील त्यांनी स्पष्ट केलं. 



ठाकरे सरकारचा उल्लेख 'स्थगिती सरकार' असा करत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. ग्रामविकासच्या कामांना स्थगिती, नगरविकासच्या कामांना स्थगिती, तीर्थक्षेत्रांच्या कामांना स्थगिती. प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. 'स्थगिती सरकार' अशी प्रतिमा होणं धोकादायक आहे. त्यामुळे तत्काळ कामं सुरू झाली पाहिजेत, अशी मागणी फडणवीसांनी केली. 

Web Title: maharashtra winter session bjp leader devendra fadnavis slams uddhav thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.