- वसंत भोसलेश्रीयुत अमितभाई शहा यांची भूमिका खणखणीत असते. त्यातून अनेक मार्ग मोकळे होतात. ज्याचा त्याचा मार्ग स्वीकारायलासुद्धा सोपे जाते. मुंबईत ते निवडणुका जाहीर होताच आले. भाजप-शिवसेना युतीची घाई झालेल्या माध्यमांनी आता अखेरचा हात फिरवून ते प्रचाराचा नारळ वाढविणार, अशा थाटात बातम्या दिल्या. मात्र, त्यांनी चौतीस मिनिटांच्या आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला ना, तसा संदेश दिला. याउलट पुन्हा एक बार ‘देवेंद्र’च हे ठासून सांगून टाकले. त्यासाठी शिवसेनेचा टेकू असेल याची शक्यताही भिरकावून देत भाजप बहुमताने सत्तेवर येईल. फिर एक बार मोदी, तसे पुन्हा एकदा ‘देवेंद्र’च हे सांगून टाकले. तेव्हा पोटात भीतीचा गोळा आला. आता अफझलखानाची कबर शोधली जाणार का? दिल्लीचे तख्त मराठी माणसाला समजते काय? वगैरे म्हणत सेना भवनातून तोफगोळे सोडले जाणार का?वास्तविक सासूच नको म्हणून संसार मोडून स्वतंत्र निवडणुकांच्या चुली मांडून पाहिल्या. मराठी माणसांनी काही एका घराची निवड केली नाही. पुन्हा घरोबा करावाच लागला. पहिल्यांदा विरोधी पक्षनेतेपद घेऊन वाटाघाटी करीत दुय्यम वागणूक स्वीकारत एकत्र नांदायचेही ठरले. तसे नांदलेही. संसार पाच वर्षे चालला. तो आम्ही किती उत्तम केला, हे सांगत महाराष्ट्रभर फिरताना मात्र वेगवेगळ्या चुली घेऊन हिंडू लागले. महाजनादेश आम्हालाच हवा, त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, असेच सांगत सुटले. दोन्ही पक्षांचे संयुक्त सरकार होते तर यश-अपयशही दोघांचेच होते. लोकसभेच्या निवडणुकीत देखील एकत्र संसार असल्याचे सांगण्यात आले. आता अमितभाईंनी मात्र वेगळाच सूर लावला आहे. तसे झाले तर या सूराला सूराने नाही तर आरडाओरडा करून गोंधळ घातला जाऊ शकतो.शिवरायांच्या इतिहासाचे दाखले दिले जाऊ शकतात आणि वेगवेगळ्या उपमांनी महाराष्ट्राची निवडणूकच ऐतिहासिक वळणावर नेऊन ठेवली जाऊ शकते. सूर्याजी पिसाळ ते अफझलखानाच्या कबरीपर्यंत हा प्रचार पोहोचू शकतो. असे असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरता का? असा सवाल उपस्थित होतो. कोणत्या प्रश्नांवर वेगळी भूमिका आहे? की, मोठ्या भावाला आता छोटा करून टाकला आहे. मोठा भाऊ हा कायमचाच मोठा असतो; पण त्यांच्या समोरच आता आम्ही मोठे झालो आहोत, असे सांगण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात आले आहे. मोठ्या भावाला दादा म्हणतात. मग, दादा लहान कसा काय होतो? तो कायमच मोठा असतो.भाजपने संधी साधली आहे. २०१४ मध्ये बहुमताची संधी अधुरी राहिली. काठावर रोखली गेली. आता का सोडा? असा सवालही त्यांच्या मनात असणार आहे. त्यामुळेच शिवसेनेने छोट्या राजपुत्राला महाराष्ट्रात फिरायला सांगितले असावे. पराभव झालाच तर तो लहान राजपुत्राचा (भावाचा) मानायला जागा राखून ठेवली आहे. याचा फैसला तरी करावा लागेल. अन्यथा, शिवाजी कोण आणि अफझलखान कोण? हे तरी महाराष्ट्राला ऐकावे लागेल. त्याची मानसिक तयारी आता मतदारांना करावीच लागेल, असे दिसते.
Vidhan Sabha 2019: युती होणार की पुन्हा एकदा अफझलखान, औकात निघणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:04 IST