बोगस कंपन्यांत महाराष्ट्र पहिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 08:00 IST2025-08-27T08:00:03+5:302025-08-27T08:00:22+5:30
Maharashtra News: काळा पैसा पांढरा करण्याचा व्यवसाय करणाऱ्या बोगस (शेल) कंपन्यांच्या यादीत महाराष्ट्र मागील दहा वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. कॉर्पोरेट मंत्रालयाने महाराष्ट्रातील एक लाखापेक्षा जास्त फ्रॉड कंपन्यांना कुलूप लावले आहे.

बोगस कंपन्यांत महाराष्ट्र पहिला
- चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली - काळा पैसा पांढरा करण्याचा व्यवसाय करणाऱ्या बोगस (शेल) कंपन्यांच्या यादीत महाराष्ट्र मागील दहा वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. कॉर्पोरेट मंत्रालयाने महाराष्ट्रातील एक लाखापेक्षा जास्त फ्रॉड कंपन्यांना कुलूप लावले आहे.
कॉर्पोरेट मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा हाती घेतल्यापासून ते आतापर्यंत देशभरातील जवळपास पाच लाख बोगस कंपन्यांवर कारवाईची झाली. २०१३-१४ ते २०१६-१७ दरम्यान २,२६,१६६ आणि २०१९-२० ते १६ जुलै, २०२५ पर्यंत २,५८,०५१ अशा एकूण ४,८४,२१७ कंपन्यांना कॉर्पोरेट मंत्रालयाने टाळे ठोकले. महाराष्ट्रातील १,०१,७५८ कंपन्यांचा यात समावेश आहे.
नोंदणी झाल्यापासून पुढील दोन वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या कंपन्या व दोन वर्षांपासून आर्थिक विवरण सादर न करणाऱ्या कंपन्यांवर कॉर्पोरेट मंत्रालयाकडून कंपनी अधिनियम २०१३ चे कलम २४८ अंतर्गत कारवाई केली जाते. मोदी सरकारच्या पहिल्या काळात मंत्रालयाने बोगस कंपन्यांच्या ३,०९,६१९ संचालकांवर कारवाई केली होती.