CoronaVirus News: खासगी प्रयोगशाळांत २,२०० रुपयांत चाचण्या; महाराष्ट्रात सर्वांत कमी दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 05:07 AM2020-06-14T05:07:20+5:302020-06-14T06:44:02+5:30

रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २,८०० रुपये इतका दर निश्चित

Maharashtra slashes COVID 19 test prices in private laboratories to 2200 rupees | CoronaVirus News: खासगी प्रयोगशाळांत २,२०० रुपयांत चाचण्या; महाराष्ट्रात सर्वांत कमी दर

CoronaVirus News: खासगी प्रयोगशाळांत २,२०० रुपयांत चाचण्या; महाराष्ट्रात सर्वांत कमी दर

Next

मुंबई : राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीतजास्त २,२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २,८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी जाहीर केले.

२ जून रोजी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने समिती गठित करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती गठित केली होती. त्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा. अमिता जोशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. या समितीला आठवडाभराचा कालावधी देण्यात आला होता. निर्धारित केलेल्या कालावधीत समितीने आपला अहवाल सादर करून सामान्यांना दिलासा दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

टोपे म्हणाले की, राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी ४,५०० रुपये आकारत होत्या. घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे ५,२०० रुपये आकारले जात होते. मात्र, समितीने केलेला अभ्यास आणि काढलेल्या निष्कर्षावरून आता राज्यात कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २,२०० रुपये आकारले जातील, तर घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी २,८०० रुपये आकारले जातील. संपूर्ण देशात एवढे कमी शुल्क अन्यत्र कुठेही नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या दर निश्चितीमुळे सामान्यांना दिलासा मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. देशात महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या ५३ शासकीय आणि ४२ खासगी, अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत ६ लाख २४ हजार ९७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख ०१ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के ) आले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सध्या आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच चाचण्या होत आहेत. या चाचण्यांत कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गंध, चव न समजणे कोरोनाचे लक्षण
नवी दिल्ली : गंध व चव न समजणे आता कोरोनाचे लक्षण समजले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत म्हटले आहे की, कोरोनाच्या रुग्णांमध्ये ताप, थकवा जाणवणे, खोकला, श्वसनास त्रास, मांसपेशींमध्ये वेदना, नाकातून पाणी वाहणे, गळा खवखवणे, जुलाब आदी लक्षणे दिसून येत होती.

काही रुग्णांचा अभ्यास केला असता त्यांनी गंध व चव न समजण्याच्याही तक्रारी केल्याचे समोर आले आहे. वृद्ध व विशेषरूपाने पीडित रुग्णांमध्ये थकवा, हालचाली मंदावणे, भूक कमी लागणे, जुलाब व तापेचा अभाव लक्षणेही दिसत नाहीत. बालकांमध्ये ताप किंवा खोकला अशी वयस्कांमधील लक्षणे अनेक वेळा दिसत नाहीत.

अमेरिकेतील राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्थेने मे महिन्याच्या प्रारंभी चव व गंध न समजण्याचा कोरोनाच्या लक्षणांमध्ये समावेश केला होता.

कोरोना रुग्णांमध्ये ताप (२७ टक्के), खोकला (२१ टक्के), घसा खवखवणे (१० टक्के), श्वसनास त्रास (८ टक्के), अशक्तपणा (७ टक्के), नाक वाहणे
(३ टक्के) आणि इतर २० टक्के लक्षणे दिसली आहेत.

Web Title: Maharashtra slashes COVID 19 test prices in private laboratories to 2200 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.