महाराष्ट्राचा नवा विक्रम! राज्यातील २७,००० युवकांना एकाच दिवशी मिळाला रोजगार; मंत्री लोढा यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 20:37 IST2025-07-22T20:37:10+5:302025-07-22T20:37:38+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त १०२ रोजगार मेळावे

Maharashtra sets new record as 27 thousand youths in the state got employment in a single day said Minister Mangalprabhat Lodha | महाराष्ट्राचा नवा विक्रम! राज्यातील २७,००० युवकांना एकाच दिवशी मिळाला रोजगार; मंत्री लोढा यांचा दावा

महाराष्ट्राचा नवा विक्रम! राज्यातील २७,००० युवकांना एकाच दिवशी मिळाला रोजगार; मंत्री लोढा यांचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी ५७ हजार तरुणांनी नोंदणी केली तर २७ हजार तरुणांना एकाच दिवशी रोजगार मिळाला. राज्यातल्या तरुणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरावा, त्यांच्या करिअरमध्ये नवा अध्याय सुरु व्हावा, या उद्देशाने कौशल्य विभागाने हा अभिनव उपक्रम राबवला असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. मुंबईतील गांवदेवी येथील शारदा मंदिर हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते.

राज्यभरात १०२ मेळावे

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व शारदा मंदिर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला असून महाराष्ट्रभरात १०२ मेळावे आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तरुणांच्या रोजगारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम राबवला असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यातून राज्यातल्या हजारो तरुणांचे स्वप्न साकार होत असून उज्जवल भविष्याकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात यापुढे ही असे उपक्रम सुरूच राहतील असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

एकूण २५ आस्थापनांचा सहभाग

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून हजारो तरुणांना खाजगी तसेच शासकीय महामंडळात काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, विमा, लॉजीस्टिक, व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होत आहेत. मुंबईतील गांवदेवी येथील शारदा मंदिर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात एकूण २५ आस्थापनांनी सहभाग घेतला. यात पाच शासकीय महामंडळांचाही सहभाग होता. तसेच ५०० युवक-युवतींनी या मेळाव्यात नोंदणी केली.

रोजगार मिळवून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असला तरी, तरुणांना शासकीय योजनांची माहिती तसेच स्वयं रोजगाराबाबत समुपदेशन ही कौशल्य विभागामार्फत सुरू असल्याची माहिती  कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी यावेळी दिली. कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी विद्या शिंगे आणि मुकेश संखेही यावेळी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra sets new record as 27 thousand youths in the state got employment in a single day said Minister Mangalprabhat Lodha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.