Maharashtra resident doctors Strike : उद्यापासून राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 20:26 IST2021-09-30T20:24:39+5:302021-09-30T20:26:06+5:30
Maharashtra resident doctors Strike : निवासी डॉक्टरांनी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

Maharashtra resident doctors Strike : उद्यापासून राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर!
मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची शैक्षणिक फी माफी, प्रोत्साहन भत्ता, पालिका महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांचा टीडीएसचा मुद्दा व राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलसंबंधित समस्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन सेंट्रल मार्ड संघटनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले होते. मात्र, महिना उलटूनही यावर निर्णय झाला नसल्याने रास्त मागण्यांविषयी सरकार उदासीन असल्याची भावना राज्यभरातील निवासी डॉक्टरांमध्ये पसरली आहे. त्यामुळे आश्वासित मागण्या पूर्ण न झाल्याने निवासी डॉक्टरांनी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
या मागण्यांविषयीचे स्मरणपत्र निवासी डॉक्टरांनी संबंधित विभागाला दिले आहे. या स्मरणपत्रातून मार्डने राज्य शासनाला याविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. तसेच, निवासी डॉक्टरांच्या भावना लक्षात घेऊन मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत याविषयी तत्काळ निर्णय न झाल्यास एक ऑक्टोबरपासून बेमुदत राज्यस्तरीय संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही, असे निवासी डॉक्टरांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना काळातील निवासी डॉक्टरांची रुग्णसेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी शैक्षणिक फी माफीचे आश्वासन दिले होते. पण, अजूनही फी माफीचा निर्णय झाला नाही. शेवटी निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबपर्यंत मागणी मान्य न झाल्यास संपावर जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. उद्या ५ हजारहून अधिक निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे.