Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आज रविवारी १५ डिसेंबर रोजी होणार आहे. यामध्ये नागपुरात होणाऱ्या समारंभात नवे मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३०-३२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. राज्यात सुरू असलेला मंत्रिमंडळ विस्तारही महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्रातील राज्य विधिमंडळाचे आठवडाभर चालणारे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात उद्यापासून सुरू होत आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ४३ मंत्री असू शकतात. काही दिवसापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. भाजपला २०-२१ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर शिवसेनेला ११-१२ मंत्रीपदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ९-१० मंत्रीपदे मिळू शकतात.
सरकार स्थापन करण्यापूर्वी अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने गृहमंत्रालयाची मागणी केली होती, ती मागणीही भाजपने मान्य केली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळासाठी २२ मंत्र्यांची यादी निश्चित केल्याचे बोलले जात आहे. सत्तेचे वितरण आणि नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे प्राधान्यक्रम यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. राज्यात राबविण्यात येणाऱ्या योजना आणि प्रकल्पांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली होती. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवले आहे. महायुतीने २३० जागा मिळवल्या आहेत. भाजपा १३२, शिंदे गट ५७, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा मिळवल्या आहेत.