Maharashtra Politics ( Marathi News ) : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी महायुतीतर्फे ‘तिरंगा यात्रे’चे आयोजन केले होते. या यात्रेवरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे." मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा" ,अशी टीका खासदार राऊत यांनी केली.
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुतीतर्फे घेण्यात आलेल्या तिरंगा यात्रेवर टीका केली खासदार राऊत म्हणाले, तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय? कसलं श्रेय? शस्त्रसंधीचं आणि माघारीचं श्रेय का? युद्धविराम, माघार, शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो. युद्धविराम ट्रम्प यांच्या माध्यमातून झाला. या लोकांनी अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला.
"देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, जेपी नड्डा यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे, एकनाथ शिंदे यांनी देखील डोनाल्ड यात्रा काढावी. त्यांना कळतं का? युद्धबंदी, शस्त्रसंधी काय असते? आमदार-खासदार विकत घेऊन सरकार बनवण्या इतकं सोपं आहे का? ते निवडणूक आयोगाला हातात धरून पक्ष ताब्यात घेण्या इतकं सोपं नाही. युद्धाच्या मैदानातून तुम्हाला खेचलं आहे. आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
यावेळी खासदार संजय राऊत यांनी मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्यावर टीका केली. त्यांना अटक करण्याची मागणी केली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान मीडिया ब्रीफिंगमध्ये सहभागी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. दरम्यान, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने भाजप मंत्री कुंवर विजय शाह यांच्याविरुद्ध स्वतःहून एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने अशा प्रकारची देशद्रोही विधान केली. त्यांनी अनेक प्रकारची अशी विधान केली आहेत. हिंदू-मुसलमानांमध्ये भांडण लावणे. सोफिया कुरेशी यांना पाकिस्तान किंवा आतंकवादी म्हणणं, हा देशद्रोह आहे, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी केली.