Maharashtra Politics: शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरुन भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात असे लोक निवडून आले आहेत, ज्यांच्याबद्दल लोकांनाही माहिती नाही की, ते आमदार आहेत. हे सगळे लोक 'मत चोरी'मुळे आमदार झाले आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा भाजपचे ९०% आमदार मते चोरुन किंवा हेराफेरी करुन आमदार झाले,' असा दावा संजय राऊत यांनी केला.
आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, 'हे देशद्रोही लोक आमच्यावर आरोप करतात. आम्ही कधीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत इतर कोणाचाही फोटो लावला नाही. आता पंतप्रधान मोदींचा मोठा फोटो लावणे सुरू केले आहे. हिम्मत असेल तर पंतप्रधान मोदींपेक्षा आनंद दिघेंचा मोठा फोटो लावून दाखवा. शिंदे गट हळूहळू भाजपमध्ये विलीन होत आहे,' असा दावा राऊत यांनी केला.
जयंत पाटील भाजपात येत नाहीत म्हणून...
'भाजपचे लोक एकमेकांचे बाप काढत आहेत, ही सुरुवात नारायण राणे यांच्या मुलांनी केली. त्यांना फडणवीसांनीच अभय दिले आहे. आमच्याही तोंडूनन एखादा शब्द जातो, पण आम्ही कुणाचा बाप नाही काढला, बापाचे कर्तृत्व नाही काढले. राजारामबापू यांनी सहकारक्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे. त्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी निकटचा संबंध आला आहे, त्यांच्या विषयी कोणी बोलावं आणि कोणत्या भाषेत बोलावं, हे जर भाजपच्या लोकांना कळत नसेल, तर त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासला आहे. फडणवीसांनी त्यासाठी ठराविक माणसे नेमली आहेत. ही टीम फडणवीस आहे. फडणवीसांनी या व्यक्तीला 12 ते 13 वेळा समज दिली, असे मी वृत्त वाचले. जयंत पाटलांवर तुमचा राग यासाठी आहे की, ते तुमच्या पक्षात यायला तयार नाही,' असेही राऊत यावेळी म्हणाले.
प्रताप सरनाईकांवर निशाणा
जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांबद्दल राऊत म्हणाले, 'शिंदे गटाचे आव्हान स्विकारत काल रात्रीच ठाण्यात जाऊन आलो आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. मी एकटा फिरतो. माझ्यासोबत सरकारी पोलीस बंदोबस्त किंवा गाड्यांचा ताफा नसतो. त्यांना आनंद दिघे समजले नाहीत किंवा माहिती नाहीत. त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी तो सिनेमा काढला, त्यातील ९० टक्के गोष्टी खोट्या आणि भंपक आहेत.'
त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या विधानाचा देत म्हटले, 'प्रताप सरनाईक यांनी असे विधान केले की, एकनाथ शिंदे यांनी राजन विचारे नावाच्या दगडाला शेंदूर फासला. मग प्रताप सरनाईक नावाच्या धोंड्याला कोणी शेंदूर फासला? उद्धव ठाकरे यांनीच ना...सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेत आमदार आणि मंत्री होण्यासाठी आले. त्यांच्यावर इडीच्या धाडी पडल्यानंतर ते पळून गेले. हा त्यांचा इतिहास आहे. त्यांनी राजन विचारे यांच्याविषयी बोलू नये,' अशी टीका राऊतांनी केली.
मुंबई-दिल्ली बुलेट ट्रेन का केली नाही?
संजय राऊत यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबतही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, 'आम्ही बुलेट ट्रेनला कायम विरोध करणार. कारण, आम्ही कधीच त्याची मागणी केली नव्हती. तुम्ही दिल्लीला मुंबईशी का जोडले नाही? तुम्हाला मुंबईला गुजरातशी जोडण्याची घाई आहे. मुंबईच्या वाहतूक आणि पायाभूत सुविधा पाहा, याचे याचे काही उत्तर आहे का?' असा सवालही त्यांनी यावेळी सरकारला केला.