Maharashtra Political Crisis: शिवसेनेला वाटतं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पण शरद पवार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 10:20 IST2022-06-29T10:19:23+5:302022-06-29T10:20:02+5:30
Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणील सामोरे न जाताच राजीनाम द्यावा, असा विचार शिवसेनेमधून मांडण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मात्र बहुमत चाचणीला सामोरे जावे असा सल्ला दिला आहे.

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला वाटतं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पण शरद पवार म्हणतात...
मुंबई - गेल्या काही तासांत घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे संकटात सापडले आहे. काल रात्री भाजपा नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेत महाविकास आघाडी सरकार अल्पमता असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणील सामोरे न जाताच राजीनाम द्यावा, असा विचार शिवसेनेमधून मांडण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मात्र बहुमत चाचणीला सामोरे जावे असा सल्ला दिला आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पुढे कुठले पाऊल उचलावे यावरून महाविकास आघाडीमध्ये तसेच शिवसेनेमध्ये खल सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा द्यावा, असा शिवसेनेमध्ये एक मतप्रवाह आहे. जर उद्या अधिवेशन झाले तर भाजप आणि बंडखोर गटाकडून महाविकास आघाडी सरकारवर आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली जाण्याची शक्यता आहे. तसेच अधिवेशनातीला कामकाजाचे लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे, त्यामुळे शिवसेनेची बदनामी होईल, असे या गटाचे म्हणणे आहे.
मात्र महाविकास आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राजीनामा न देता बहुमत चाचणीला सामोरे गेले पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला जाईल. त्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद होतील. त्यानंतर त्या मुद्द्याचं निमित्त करून हिंदुत्वाचा दाखला देत उद्धव ठाकरे राजीनामा देतील. तसेच शेवटच्या क्षणी हिंदुत्वाचं कार्ड खेळून हिंदुत्ववादी मतदारांना शिवसेनेकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील, असेही सांगण्यात येत आहे.