Maharashtra Political Crisis: बच्चू कडू उद्या मुंबईत येण्याची शक्यता; शिंदे गट अपक्षांना राज्यपालांच्या भेटीला पाठविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:00 IST2022-06-28T18:45:40+5:302022-06-28T19:00:18+5:30
Maharashtra Political Crisis: या आमदारांच्या संरक्षणासाठी तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना तैनात केले जाईल.

Maharashtra Political Crisis: बच्चू कडू उद्या मुंबईत येण्याची शक्यता; शिंदे गट अपक्षांना राज्यपालांच्या भेटीला पाठविणार
एकीकडे मविआ सरकार संकटात आलेले असताना मंत्रिमंडळ बैठकांमध्ये लोकहिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मविआ सरकार निवडणुकीची तयारी करत आहे. असे असताना तिकडे शिंदे गट मविआ सरकारला सुरुंग लावण्याची तयारी करत आहे. अशातच शिंदे गटाचे काही आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
आषाढी अमावास्येमुळे शिंदे गटाने राज्यपालांना भेटण्याचे पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला चर्चेला मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तर शिंदे यांनी एका दिवसाची मुदत देत, ठाकरेंनी निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. यामुळे अमावास्या संपली की उद्या बच्चू कडू १० बंडखोर आमदारांना घेऊन मुंबईत येणार असून राज्यपालांना भेटतील असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. मराठी वृत्त वाहिन्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
कडू हे राज्यपालांना ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे पत्र देतील. या पत्रावर शिवसेनेच्या गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांची सही असणार आहे. पत्र तयार आहे, रात्रीपर्यंत सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या जातील. या आमदारांमध्ये शिवसेना नाही तर अपक्ष आमदार अधिक असण्याची शक्यता आहे. तसे सूतोवाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. शिवसेना आमदारांपेक्षा अपक्ष आमदारच पुढे होऊन राज्यपालांना ठाकरे सरकारविरोधात पत्र देतील, असे ते म्हणाले होते.
या आमदारांच्या संरक्षणासाठी तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना तैनात केले जाईल.