महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 06:33 IST2025-12-22T06:32:29+5:302025-12-22T06:33:22+5:30
Maharashtra Nagar Parishad Election Results news: महामुंबईतील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील १६ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला.

महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महामुंबईतील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील १६ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. त्यानुसार भाजप आणि शिंदेसेनेने प्रत्येकी ५ नगराध्यक्षपदांवर विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तिघांनी बाजी मारली. दुसरीकडे शेकाप, शरद पवार गट आणि उद्धवसेनेला प्रत्येकी एका ठिकाणी विजय मिळवता आला.
ठाणे जिल्ह्यातील चित्र
कुळगाव बदलापूरमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या रुचिता घोरपडे विजयी झाल्या. त्यांनी शिंदेसेनेच्या वीणा म्हात्रे यांचा पराभव केला. या ठिकाणी भाजप २३ आणि शिंदेसेनेला २४ जागा मिळाल्या आहेत, तर अजित पवार गटाला ३ जागा मिळाल्या आहेत. अंबरनाथमध्ये भाजपने नगराध्यक्षपद मिळवले असले तरी शिंदेसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले.
शिंदेसेना, अजित पवार गट अव्वल : रायगड जिल्ह्यातील १० पालिकांच्या निवडणुकीत अजित पवार गट, शिंदेसेनेने दमदार कामगिरी केली, तर शेकापने अलिबाग या गडावर वर्चस्व राखले आहे.
श्रीवर्धनमध्ये तटकरेंना धक्का : येथे तटकरे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. उद्धवसेनेचे अतुल चौगुले यांनी खा. तटकरे यांच्या वर्चस्वाला, तर अलिबागचे आ. महेंद्र दळवी यांना धक्का दिला आहे.
रायगडमध्ये ६ पालिकांवर महिलाराज : सहा पालिकांच्या नगराध्यक्षपदी महिलांनी बाजी मारली. त्यांत शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या प्रत्येकी ३ तीन नगराध्यक्षा आहेत. उरणमध्ये भाजपचे आ. महेश बालदी यांच्या बालेकिल्ल्यात मविआच्या भावना घाणेकर यांनी नगराध्यपदी आश्चर्यकारक विजय मिळविला.
पालघरमध्ये भाजप-शिंदेसेना विरोधात लढले
डहाणूत शिंदेसेनेसह महाविकास आघाडीतीलही अन्य पक्षांनी एकत्र येत भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा पराभव करीत शिंदेसेनेचा भगवा फडकवला.
जव्हार नगरपालिका आणि वाडा नगरपंचायत जिंकण्यात भाजपला यश आले. या दोन्ही ठिकाणी उद्धवसेनेच्या सत्तेला भाजपने दणका दिला. त्यामुळे येथे या पक्षाला आता आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.
पालघरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेने परस्परांना आव्हान दिल्यावर पालघर, डहाणू, जव्हार नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीची निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. पालघर नगरपालिकेत शिंदेसेनेने बालेकिल्ला कायम राखला.