लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नाशिक : नाशिकसह राज्यातील काही राजकीय नेते, आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सेक्स स्कॅण्डल आणि हनी ट्रॅपमध्ये अडकल्याच्या चर्चेनंतर खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटल्यावर या सर्व प्रकरणांची गोपनीय चौकशी सुरू झाल्याची चर्चा आहे.
राज्यातील आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची माहिती आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. हनी ट्रॅपद्वारे राज्य सरकारशी संबंधित काही गोपनीय माहिती दिली गेली असण्याची शक्यता आहे. तेव्हा सरकारने यावर निवेदन करावे, असे पटोले म्हणाले. सरकारने या मुद्द्याची नोंद घ्यावी, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.नाशिकमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राज ठाकरे यांनी हनी ट्रॅप व सेक्स स्कॅण्डलची माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. या विषयाची राजकीय, प्रशासकीय वर्तुळात आणि विविध माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे.
विधिमंडळात नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केल्याने पोलिस यंत्रणाही खडबडून जागी झाली असून, नाशिकमध्ये या प्रकरणाची गोपनीय चौकशी सुरू असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणी आमच्याकडे अधिकृत तक्रार नाही या चर्चा केवळ माध्यमांतून आपल्याला कळल्या असल्याचे नाशिकचे पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.
नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका तारांकित हॉटेलमध्ये महसूल विभागातील काही सनदी अधिकारी, नेते सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकल्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये आहे. काही व्हिडीओ क्लिप महिलांकडे असून, त्याद्वारे या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याच्या चर्चेनंतर आता शहर पोलिस यंत्रणेच्या गोपनीय शाखा, विशेष शाखा, गुन्हे शाखांकडूनही याबाबत माहिती घेतली जात असल्याचे समजते. नेमक्या संबंधित त्या महिला कोण आहेत? सेक्स स्कॅण्डलचा प्रकार कोणत्या हॉटेलमध्ये घडला? नाशिकमधील नेमके कोण आणि किती वरिष्ठ अधिकारी यामध्ये आहेत? याचा तपास आता पोलिस यंत्रणेकडून केला जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती केवळ नाशिकपुरती नसून राज्यातील अनेक नेते अडकल्याचे सांगितले जात असल्याने सर्वत्र या प्रकरण शोध घेतला जात असल्याचे समजते.
सेक्स स्कॅण्डलसंदर्भात ठाण्यात तीन महिलांनी तक्रारी केल्याचीदेखील चर्चा असली तरी अशा प्रकारे कोणतीही तक्रार नसल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले.