Maharashtra Lok Sabha Elections 2019: Why Raj Thackeray failed to make impact in Election | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019: ...तर राज ठाकरे फॅक्टर ठरू शकला असता 'गेम चेंजर'! 
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019: ...तर राज ठाकरे फॅक्टर ठरू शकला असता 'गेम चेंजर'! 

ठळक मुद्देराज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'नरेंद्र मोदींना पाडा' असा जणू विडाच उचलला होता. राज यांनी केलेली हवा मोदी लाटेला रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं आजच्या निकालांमधून स्पष्ट झालं. मनसेचे शिलेदार - इंजिनाच्या चिन्हावर लढणारे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवायला हवे होते. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'नरेंद्र मोदींना पाडा' असा जणू विडाच उचलला होता. राज्यभरात ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन त्यांनी, मोदी-शहा जोडीला राजकीय क्षितीजावरून हटवण्याचं आवाहन केलं होतं. 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली होती. पुलवामा हल्ल्यावरून मोदी-अजित डोवाल यांच्यावर 'सर्जिकल स्ट्राईक' केला होता. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाली, राज्यातच नव्हे तर देशभर 'हवा' झाली, पण ही हवा मोदी लाटेला रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं आजच्या निकालांमधून स्पष्ट झालं आहे. या अपयशाला राज ठाकरे यांचं चुकलेलं गणितच जबाबदार म्हणावं लागेल. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज या चुकीवर बोट ठेवलं. 

राज ठाकरे यांनी प्रत्येक सभेत मोदीविरोधी प्रचार केला, पण कुणाला मत द्या, हे कुठेच सांगितलं नाही. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात, राहुल गांधींना संधी देऊन पाहू, असं सूचक विधान त्यांनी केलं होतं. परंतु, एकदम ३६० डिग्री मन(से)परिवर्तन सैनिकांना झेपेल का, हा विचार त्यांनी करायला हवा होता. मनसैनिक 'नोटा'ला मतं देण्याची शक्यता त्यांनी लक्षात घ्यायला हवी होती.  

२०१४ मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला होता. परंतु, त्यावेळीही त्यांनी निवडक जागांवर मनसेचे उमेदवार दिले होते. त्यांना मतंही चांगली मिळाली होती. कारण, कट्टर मनसैनिकांना मतं देण्यासाठी हक्काचा उमेदवार होता. राज ठाकरेंनी मोदींना मत द्यायला सांगूनही हजारो मतदारांनी मनसेच्या उमेदवारांना मतं दिली होती. या अनुभव लक्षात घेऊन, राज ठाकरे यांनी या निवडणुकीतही एक संधी अजमावून पाहायला हरकत नव्हती. त्यांनी मोजके का होईना, मनसेचे शिलेदार - इंजिनाच्या चिन्हावर लढणारे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवायला हवे होते. 

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा केला, तेव्हा त्यांना नक्कीच आपल्या ताकदीचा अंदाज आला असेल. त्यानुसार, त्यांनी काही जागा लढवल्या असत्या तर त्या ठिकाणी मतविभाजन होऊन - त्यांचा जो मोदींना धक्का देण्याचा हेतू होतो - तो साध्य होण्याची शक्यता होती. मनसैनिकांना मत देण्यासाठी हक्काचा पर्याय मिळाला असता. तसंच, राज 'पोपट' बनून काम करत असल्याचा ठपकाही टाळता आला असता. त्यांचं बोलणं अधिक गांभीर्याने घेतलं गेलं असतं. त्याकडे करमणूक म्हणून किंवा मोदींबद्दलचा द्वेष म्हणून नव्हे - तर त्यांचा पक्षाचा प्रचार म्हणून पाहिलं गेलं असतं. सभांना होणाऱ्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होण्याचं प्रमाण वाढलं असतं. पण, राज यांनी नेहमीप्रमाणेच 'अनाकलनीय' विचार केला आणि सगळंच गणित चुकलं.

मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी आज निकालांनंतर हाच मुद्दा मांडला. राज ठाकरे यांनी स्वतःचे उमेदवार उभे करायला हवे होते, असं त्यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडी रिंगणात उतरल्यानं झालेल्या मतविभाजनामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे साधारण डझनभर उमेदवार पडल्याचं चित्र आहे. मनसे रिंगणात असती, तर भाजपा-शिवसेनेची मतंही फुटली असती, असं त्यांचं सरळ गणित होतं. अर्थात, तसं झालंच असतं असं नाही, पण राज ठाकरेंची 'मीम्स' तरी बनली नसती, एवढं नक्की!


Web Title: Maharashtra Lok Sabha Elections 2019: Why Raj Thackeray failed to make impact in Election
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.