देशाच्या आर्थिक वाढीची धुरा महाराष्ट्राकडेच; पर्यटन क्षेत्राला संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:06 IST2025-08-26T14:02:32+5:302025-08-26T14:06:44+5:30
भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरच्या उंबरठ्यावर पोहोचविताना महाराष्ट्र महत्त्वाचा प्रवर्तक ठरणार आहे. पर्यटन, पायाभूत सुविधा, उद्योग गुंतवणूक, सहकार चळवळ, कृषी व लोककल्याणकारी योजना या सर्व घटकांच्या बळावर महाराष्ट्र देशाच्या आर्थिक वृद्धीचे नेतृत्व करेल, असा विश्वास राज्यातील नेत्यांनी लंडनमधील ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’मधील परिसंवादात व्यक्त केला.

देशाच्या आर्थिक वाढीची धुरा महाराष्ट्राकडेच; पर्यटन क्षेत्राला संधी
लंडन - भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरच्या उंबरठ्यावर पोहोचविताना महाराष्ट्र महत्त्वाचा प्रवर्तक ठरणार आहे. पर्यटन, पायाभूत सुविधा, उद्योग गुंतवणूक, सहकार चळवळ, कृषी व लोककल्याणकारी योजना या सर्व घटकांच्या बळावर महाराष्ट्र देशाच्या आर्थिक वृद्धीचे नेतृत्व करेल, असा विश्वास राज्यातील नेत्यांनी लंडनमधील ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’मधील परिसंवादात व्यक्त केला.
थेम्स नदीच्या तीरावर झालेल्या या परिषदेत ‘महाराष्ट्र : इकॉनॉमिक पाॅवरहाऊस ऑफ इंडिया’ हा परिसंवाद पार पडला. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी संचलित केलेल्या या परिसंवादात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रशांत बंब, आमदार पराग शहा आदींनी विचार मांडले.
महाराष्ट्र एक ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जाऊ पाहत आहे. हे कसे साध्य करणार? या दर्डा यांच्या प्रश्नाने परिसंवादाला सुरुवात झाली. नार्वेकर म्हणाले, महाराष्ट्राकडे विस्तृत सागरी किनारा आहे. त्यामुळे पर्यटनाच्या विकासाला प्रचंड संधी आहे. त्याशिवाय ‘समृद्धी’, ‘शक्तिपीठ’, ‘अटल सेतू’सारखे अनेक प्रकल्प आहेत. त्यामुळे राज्य नक्कीच वृद्धी गाठेल. यावेळी अशोक चव्हाण, सुनील तटकरे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, संजय शिरसाट, खासदार धनंजय महाडिक, प्रशांत बंब, पराग शहा यांनी विचार मांडले. अनेक क्षेत्रांत आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. मात्र, आपला सध्याचा वेग आणि क्षमता लक्षात घेता भविष्यातील एक आर्थिकदृष्ट्या ताकदवान देश म्हणून आपण उभे असू. देशाच्या आर्थिक वाढीची धुरा महाराष्ट्राकडेच असेल. पुढील १० वर्षांत महाराष्ट्रसह देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.