सोलापूर - गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे राज्यातील बहुतांश भागात पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागालाही पुराचा मोठा फटका बसला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यातील निमगांव, दारफळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पुरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलं आहे. कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
पुरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मदत करताना सरकार कुठेही आखडता हात घेणार नाही. संकटात सरकार पाठीशी आहे, एकमेकांना धीर द्या, मदत सर्वांना मिळेल. सरकार कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार. आवश्यकतेनुसार निकष शिथिल करून शेतकरी आणि नागरिकांना मदत केली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
व्यावसायिक, फळबागा, नुकसानग्रस्त सरकारी कार्यालयांनाही मदत केली जाईल. तसेच पुराचा फटका बसलेल्या वस्त्या आणि शाळांनाही मदत केली जाईल आणि तातडीची मदत लवकरच दिली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.