मुंबई : विधानसभा निवडणूक निकालाच्या २५ दिवसानंतरही राज्यात सत्तापेच कायम आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावरून भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी संधान साधले आहे. मात्र, वाटाघाटींवरच अजून घोडे अडले आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजप-शिवसेनेची आहे, असे सांगून शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार बनू शकत नाही, असे पवार यांनी सूचित केल्याचे म्हटले जात आहे. मात्र भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येतील का, याबाबतही साशंकता व्यक्त होत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी कशी फुटणार, हा प्रश्न अजुनही अनुत्तरीच आहे.शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे सरकार मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आता धूसर होत चालली आहे. अशावेळी शिवसेना भाजपसोबत जाईल का या बाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेने गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे ती बघता शिवसेनेला आता सोबत घेऊच नका, असा मोठा सूर भाजपमध्ये आहे.युतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेली शिवसेना आता तो दावा सोडून भाजपसोबत जाईल, अशी शक्यता कमी आहे. त्यातच शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे आणि संसदेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी त्यांनी केंद्राविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.आठवले यांनी सुचविला ‘तीन-दोन’चा फॉर्म्युला!भाजपला तीन वर्ष तर शिवसेनेला दोन वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी आपली सूचना असून त्या बाबत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.तीन-दोनबाबत मी राऊत यांना विचारल्यावर भाजपचा काय प्रस्ताव आहे ते बघू. आमची चर्चेची तयारी असेल, असे त्यांनी सांगितल्याचा दावाही आठवले यांनी केला.उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्दराज्यात सरकार स्थापनेचा घोळ कायम असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे. ते २४ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार होते.रामजन्मभूमी प्रकरणी निकालानंतर प्रतिक्रिया देताना उद्धव यांनी ते २४ नोव्हेंबरला रामलल्लाच्या दर्शनासाठी जातील, असे सांगितले होते. तथापि, आता राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते तूर्त अयोध्येला जाणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपमध्ये अजूनही शिवसेनाविरोधीच सूर; पेच कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:19 IST