संधीचे सोने करा आणि एकजुटीने सरकारला धारेवर धरा, उद्धव ठाकरे यांचा आमदारांना कानमंत्र
By नरेश डोंगरे | Updated: December 17, 2024 22:04 IST2024-12-17T22:01:05+5:302024-12-17T22:04:45+5:30
Maharashtra Assembly Winter Session : त्यांचे संख्याबळ जास्त असले तरी नाराजांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्ही संधीचे सोने करा आणि जनतेच्या प्रश्नांवर एकजुटीने सरकारला धारेवर धरा, असा कानमंत्र शिवसेना उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या पक्षाच्या आमदारांना दिला.

संधीचे सोने करा आणि एकजुटीने सरकारला धारेवर धरा, उद्धव ठाकरे यांचा आमदारांना कानमंत्र
- नरेश डोंगरे
नागपूर - एकटे असलो तरी सभागृह डोक्यावर घेता येते. त्यांचे (सत्तपक्षचे) संख्याबळ जास्त असले तरी नाराजांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्ही संधीचे सोने करा आणि जनतेच्या प्रश्नांवर एकजुटीने सरकारला धारेवर धरा, असा कानमंत्र शिवसेना उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या पक्षाच्या आमदारांना दिला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थान परिसरात उबाठा गटाच्या विधानसभा व विधानपरिषद सदस्यांकरिता विधिमंडळ कामकाजा संबंधीचे प्रशिक्षण शिबिर आज पार पडले. या शिबिरात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना एकजुटीने सत्ता पक्षावर हावी होण्याचा सल्ला दिला.
ते म्हणाले, संधी मिळाली की सोने करता येते आणि एकटे असलो तरी सभागृह डोक्यावर घेता येते. आपल्याकडे छगन भुजबळ होते. तेव्हा ते विरोधी पक्षात असूनही एकटेच सभागृह दणाणून सोडायचे. यावेळी सत्ता पक्षाचे संख्याबळ खूप जास्त असले तरी त्यांच्यातील नाराजीची संख्याही तेवढीच जास्त आहे. तुम्ही २० च्या संख्येत आहात. सत्ता पक्षातील नाराजीचा अचूक फायदा उचलत लोकहिताच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरा आपल्याला कुणाच्याही व्यक्तिगत भानगडी काढायच्या नाहीत. मात्र राज्यातील जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर सत्तापक्ष चालढकल करत असेल तर त्यांना सोडू नका.
विधिमंडळ अधिवेशनातून जनतेचे प्रश्न मांडण्याची चांगली संधी असते. त्यामुळे जनतेच्या समस्यांशी संबंधीत तरांकित प्रश्न , लक्षवेधी यासारखी आयुध प्रभावीपणे वापरा. प्रश्न धारदार असले पाहिजे आणि तुमचा अभ्यासही तेवढाच चांगला असला पाहिजे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
पक्षातील आमदारांना कानमंत्र देताना तो बाहेर जाणार नाही, याची खबरदारी ठाकरे यांनी घेतली. त्यासाठी त्यांनी आमदारांना संबोधित करण्यापूर्वी सभागृहात आमदाराव्यतिरिक्त कोणी असेल तर त्यांनी बाहेर निघून जावे, अशी सूचना केली. दुसरे म्हणजे, आपण आपल्या आमदारांना काय सांगतो, ते सभागृहाच्या बाहेर ऐकायला जाऊ नये, यासाठी त्यांनी माईक वापरण्याचे टाळले. आमदारांना अगदी पुढ्यात बसवून त्यांनी हिवाळी अधिवेशनात आणि पुढच्या अधिवेशनात पक्षाच्या आमदारांची भूमिका काय असायला हवी, त्या संबंधाने मार्गदर्शन केले. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
जाधव, परब, दानवेचेही संबोधन
रात्री सात वाजता सुरू झालेल्या या प्रशिक्षण शिबिराला प्रारंभी पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि अनिल परब यांनी मार्गदर्शन केले. तर समारोपीय सत्राला अंबादास दानवे यांनी संबोधित केले.