मुंबई : अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे हे तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात कामकाज सांभाळत असताना त्यांनी विरोधकांना दुखावणारी राजकीय टिप्पणी केली असे म्हणत विरोधी सदस्यांनी शुक्रवारी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर, अध्यक्षांच्या आसनाचा उपयोग राजकीय हेतूने केला जाणार नाही, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आश्वासित केले.
शून्य तासात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. गुरुवार आणि शुक्रवारच्या सकाळच्या सत्रात चेतन तुपे हे तालिका अध्यक्ष होते. तेव्हा विरोधकांबाबत त्यांनी अवमानकारक भाषा वापरली. विरोधकांची अप्रतिष्ठा केली. आमचा अपमान होईल, अशा पद्धतीने ते बोलले असे वडेट्टीवार म्हणाले.
तुपे यांना कडक शब्दात समज देण्याची मागणी
उद्धवसेनेचे भास्कर जाधव म्हणाले, की अध्यक्षांच्या आसनावर बसून तालिका अध्यक्षांनी अशी वक्तव्ये केली याचा अर्थ ती अध्यक्षांनीच केलेली आहेत असे मानले तुपे यांना कडक शब्दात समज दिली जावी. काँग्रेसचे नाना पटोले यांनी अध्यक्षांच्या खुर्चीचे पावित्र्य अशा विधानांमुळे कमी होते, अशी खंत व्यक्त केली.
योग्य ती कार्यवाही करीन नार्वेकर यांचे आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, अध्यक्षांनी आसनावर बसून कुठली वक्तव्ये करावीत हे नियमात नाही पण ‘स्पिरिट ऑफ द लॉ’ आणि ‘लेटर ऑफ द लॉ’ असे दोन भाग असतात. या दोन्हींचे भान ठेवूनच अध्यक्षांनी वक्तव्ये करावीत हेच अपेक्षित असते. तुपे यांचे नाव न घेता ते म्हणाले की या बाबत मी माझ्या दालनात चर्चा करून योग्य ती कार्यवाही करीन.