देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत समोर आलेल्या कलांमधून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल असे संकेत मिळत आहेत. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीने २२१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ५६ जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, या निकालांवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. हा कौल कसा मानावा, कुछ तो गडबड है असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, हा निकाल पाहून माझ्या मनात एकच शब्द आला तो म्हणजे कुछ तो गडबड है. एकनाथ शिंदे यांना ५६ जागा कुठल्या भरोशावर मिळताहेत. अजित पवार यांना ४० पेक्षा अधिक जागा कुठल्या आधारावर मिळताहेत. तसेच देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी दिवे लावलेत की येथे त्यांना १२० पेक्षा अधिक जागा मिळताहेत. महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्राचा कल ज्या पद्धतीने होता. आम्ही राज्यभर फिरलोय. हा निकाल हा लोकशाहीचा कौल मानण्याची प्रथा परंपरा आम्ही पाळलेली आहे. आम्ही ती मानतो, पण हा कौल कसा मानावा, हा प्रश्न राज्यातील जनतेलाही पडला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. तुम्ही त्यांना दहा जागाही द्यायला तयार नाहीत. हे महाराष्ट्रामध्ये शक्य आहे का? ही काय गडबड आहे हे सगळ्यांना कळेल. पण जरी हा निकाल आला असला तरी हा जनतेचा कौल आहे, असं आम्ही मानायला तयार नाही. जनतेचा कल हा नव्हता. मी १०० टक्के सांगतो, जय पराजय होत असतात. निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये हारजीत होत असते. त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण हे निकाल लावून घेतलेले आहेत, या निकालांवर लोकशाही मानणाऱ्या माझ्यासारख्या माणसाचा विश्वास असू शकत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हे निकाल लाडकी बहीण योजनेमुळे लागले असे मी मानत नाही. महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ, लाडके दादा, लाडके आजोबा नाही आहेत का? मी पुन्हा सांगतो काही तरी गडबड आहे आणि मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर अदानीचं बारीक लक्ष होतं. विशेषत: अदानींविरोधात काल अटक वॉरंट निघालं होतं. अशा प्रकारचे निकाल येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. गौतम अदानींवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे अप्रत्यक्षपणे भाजपावर झालेले होते. शिंदे यांच्यावर होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक पैशांचा वापर आणि तादक ही अदानीने लावली होती. आताही या निकालांवर गौतम अदानीचा प्रभाव आहे का? कारण अदानी, मोदी आणि फडणवीस हे वेगळे नाहीत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, हा निकाल लावून घेतलेला, हा जनतेचा कौल नाही. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांनी हा निकाल लावून घेतला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.