छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून आज विधान परिषदेमध्ये जोरदार गदारोळ झाला. औरंगजेब बादशहाची स्तुती करणाऱ्या अबू आझमींच्या निलंबनाचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर विरोधकांनी प्रशांत कोरटकर याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी विरोधकांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत कोरटकर वगैरे चिल्लर लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच, पण तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामधून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या लिखाणाचा निषेध करणार का? असा प्रतिप्रश्न विरोधकांना केला. त्यावरून सभागृहातील वातावरण काही काळ चांगलंच तापलं.
प्रशांत कोरटकरने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तितक्याच आक्रमकपणे विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, कोरटकरला १०० टक्के अटक होईल. मात्र त्याने कोल्हापूरमधील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. मात्र त्याविरोधात मी वरच्या कोर्टात जाण्यास सांगितलं आहे. पण ही कोरटकर वगैरे माणसं चिल्लर आहेत. जितेंद्र आव्हाड काय बोलले होते त्याचा तुम्ही कधी निषेध केलेला नाही. औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराजांना ओळखलं जातं, औरंगजेब किती बलाढ्य होता आणि शिवाजी महाराज पाच फुटाचे होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. हे रेकॉर्डवर आहे, याचा तुम्ही निषेध केलेला नाही. असा सिलेक्टिव्ह निषेध करू नका, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं आहे, त्याचा तुम्ही निषेध करणार आहात का? आहे का हिंमत? असा सवाल विरोधकांना केला. फडणवीस यांनी हा उल्लेख करताच विरोधकांनी गोंगाट करून जोरदार गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
''आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. त्यामुळे याठिकाणी पंडित नेहरू यांचाही निषेध झाला पाहिजे'', असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.