महाडिकांच्या सर्वपक्षीय राजकारणाला झटका
By Admin | Updated: December 31, 2015 00:18 IST2015-12-31T00:09:20+5:302015-12-31T00:18:25+5:30
विधान परिषद निकाल : पडसाद पुढील लोकसभा, विधानसभेपर्यंत; ‘सतेज पाटील विरुद्ध महाडिक’ संघर्ष अधिक तीव्र होणार

महाडिकांच्या सर्वपक्षीय राजकारणाला झटका
विश्वास पाटील - कोल्हापूर -कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांचा ६३ मतांनी पराभव केल्यामुळे महाडिक यांच्या सर्वपक्षीय राजकारणाला झटका बसला. १९९७ मध्ये ज्या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून ते विजयी झाले त्याच पक्षाच्या उमेदवारीने त्यांचा पराभव केला.‘महाडिक विरुद्ध सर्व’ असेही काहीसे चित्र या निवडणुकीत दिसले. या लढतीचे परिणाम आता लगेच कोणत्या निवडणुकीवर पडणार नसले तरी त्याचे धक्के लोकसभा निवडणुकीतही बसणार हे नक्की आहे. ‘सतेज पाटील विरुद्ध महाडिक’ हा संघर्ष यापुढच्या काळातही अधिक तीव्र होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या काँग्रेसच्या राजकारणातही या विजयाने सतेज पाटील यांना हीरो बनवून टाकले आहे. जिल्ह्याचे नेतृत्व म्हणूनही त्यांना या विजयाने मान्यता दिली आहे. उमेदवारी मिळविताना त्यांना महाडिक, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याशी झगडावे लागले. त्यातील महाडिक पक्षातून बाहेरच गेले आहेत. आवाडे यांनी सतेज यांच्याशी जमवून घेतले आहे. पी. एन. व त्यांचे संबंध फारसे बिघडलेले नसले तरी म्हणावे तेवढे चांगलेही नाहीत. त्यामुळे काँग्रेसतंर्गत राजकारणातही या निकालाचे पडसाद उमटू शकतात. राजकारणातील ज्या युक्त्या करून महाडिक यांनी ही जागा आपल्याकडे सलग अठरा वर्षे राखली त्याच युक्त्यांचा वापर करून सतेज पाटील यांनी त्यांच्यावर मात केली. महाडिक यांच्या पराभवाची पायाभरणी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीने केली. देशाच्या व राज्याच्या राजकारणात भाजप हा किमान पंधरा वर्षे हलत नाही, अशी हवा त्यांच्या काही निकटवर्तीयांनी तयार केली. मुलगा भाजपचाच आमदार आहे, तेव्हा त्याच पक्षाची संगत केली, तर राजकीयदृष्ट्या ते फायद्याचे ठरेल म्हणून त्यांनी काँग्रेसला फाट्यावर मारून भाजपला जवळ केले. भाजप व ताराराणी आघाडीचे मिळून ५० नगरसेवक निवडून येतील आणि महापालिकेतही सत्ता आल्यानंतर आपल्याला काँग्रेसच्या उमेदवारीची गरजच भासणार नाही, असा महाडिक यांचा होरा होता; परंतु तिथेच त्यांची फसगत झाली. महापालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकल्यानेच सतेज पाटील यांना पक्षाची उमेदवारी मिळू शकली. त्याशिवाय दोन्ही काँग्रेससह अपक्षांची मोट बांधून ४५ चा आकडा गाठल्यावर त्यांची बाजू भक्कम झाली. महापालिकेत सत्ता मिळाली नसती तर त्यांनी निवडणूक लढविण्याचे धाडस केले नसते. महाडिक यांना त्यांच्या दोन्ही निवडणुकीत महापालिकेतील सत्तेनेच मोठा हात दिला होता. तिथे त्यांना किमान ५० मते मिळायची. हे मताधिक्य फेडण्याला दुसरा वावच नसल्याने विरोधी उमेदवारास हीच हबकी बसायची. तोच ‘हबकी डाव’ सतेज यांनी त्यांच्यावर उलटवून विजय खेचून आणला.
सतेज पाटील यांना या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते माजी आमदार विनय कोरे, प्रा. जयंत पाटील यांचीही मोठी मदत झाली. महापालिकेत काय करायचे आणि विधान परिषदेला कोणते फासे टाकायचे, याचे गणित या तिघांनी अगोदरच मांडून ठेवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर धनंजय महाडिक खासदार म्हणून निवडून आले; परंतु पुढच्या राजकारणात ‘मुश्रीफ विरुद्ध धनंजय महाडिक’ असा छुपा राजकीय संघर्ष सुरू झाला. त्यात खासदार महाडिक यांनीही महापालिका निवडणुकीत पक्षाला बेदखल करून ताराराणी आघाडीच्या मागे ताकद लावली. ज्यांनी लोकसभेला महाडिक यांना निवडून आणले त्याच पक्ष कार्यकर्त्यांच्या विरोधात ते महापालिकेच्या निवडणुकीत काम करत होते.
शेवटच्या चार दिवसांत राष्ट्रवादी पुढे सरकते म्हटल्यावर मुख्यत: महाडिक गट व भाजपकडून जोरदार फिल्डिंग लावली गेली. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीच्या पाच-सहा जागा कमी झाल्या. त्याबद्दल मुश्रीफ यांनीही खासदार महाडिक यांच्या नावाने उघड नाराजी व्यक्त केली. सत्यजित कदम-मुश्रीफ वाद असो की, सुनील कदम यांची पत्रकबाजी असो त्यात महाडिक यांच्याकडून कटुता वाढेल असा व्यवहार झाला. त्याचा राग म्हणून मुश्रीफ यांनी स्वत: उमेदवार असल्याप्रमाणे यंत्रणा राबविली. जिल्ह्यात मुश्रीफ व कोरे यांचा मुत्सद्दीगिरीच्या राजकारणात कोण हात धरू शकत नाही. त्यात सतेज पाटील यांचे भक्कम पाठबळ मिळाल्यावर या तिघांची गट्टी जमली ती महाडिक यांचा पराभव करून गेली.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत मुश्रीफ यांच्यामुळेच महाडिक यांना विजय मिळाला व या निवडणुकीत त्याच मुश्रीफ यांंच्यामुळे सतेज पाटील यांचाही विजय पक्का झाला. या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहिली. मुश्रीफ यांनी दोन्ही नेत्यांचे पैरे फेडले व लोकसभेसाठी सतेज यांनी पैरा करावा, अशी व्यवस्था करून ठेवली.
सन १९९७ व सन २०१५ मधील फरक
काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही, मुश्रीफ-कोरे हे आपल्यासोबत नाहीत, त्यामुळे ही लढत आपल्याला सोपी नाही हे न समजण्याएवढे महाडिक नक्कीच दुधखुळे नाहीत. उभी हयात त्यांची राजकारणात गेली आहे. त्यामुळे त्यासंबंधीचे त्यांचे गणित पक्के होते; परंतु तरीही ते रिंगणात उतरले त्याचे कारण म्हणजे त्यांना सतेज यांना हा विजय सहजासहजी मिळू द्यायचा नव्हता.
गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी प्रा.जयंत पाटील यांना पाठिंबा देऊन महाडिक यांना विजयासाठी झगडायला लावले. तीच नीती महाडिक यांनी यावेळेला वापरली.
गणित जमलेच तर चांगलेच; नाही जमले आणि पराभव झाला तरी बेहत्तर; परंतु सतेज यांनाही विजयासाठी पळायला लावायचे व पैसे खर्च करायला लावायचे या हेतूने त्यांनी हा धोका पत्करला.
यापूर्वी सन १९९७ ला ही सगळी काँग्रेस एकीकडे व महाडिक एकटे विरोधात असे चित्र होते; परंतु त्यावेळी विरोधात विजयसिंह यादव होते व त्यावेळी महाडिक यांच्या राजकारणाची नुकतीच सुरुवात झाली होती. माणसे दुखावलेली नव्हती. त्याच्या बरोबर उलटे चित्र यावेळी होते. तेच त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरले.
महाडिक ‘भाजप’सोबत..
महाडिक यांना यापूर्वीच पक्षाने निलंबित केले असल्यामुळे आता ते पुन्हा त्या पक्षाचे राजकारण करण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांना भाजपचा झेंडा घेऊनच यापुढील राजकारण करावे लागणार आहे. त्याचे पडसाद ‘गोकुळ’च्या राजकारणात उमटतील; परंतु सहकारात पक्षीय राजकारण आड येत नाही, असे सांगून त्यासही नजरेआड केले जाईल.