अमरावती - कोण हिंदूंच्या नावावर तर कोण इतरांच्या नावावर तुम्हाला लुटलं जातंय. लोकसभा, विधानसभेला मी आणि बच्चू कडू स्वतंत्र लढलो, कडू यांनाही पाडले आणि मलाही खासदारकीला पाडले. खासदार झालो असतो तर दिल्लीच्या संसदेत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता. यापुढे मोठ्या पक्षांना मतदान करू नका ही माझी शेतकरी, मेंढपाळ बांधवांना विनंती आहे. काँग्रेस गद्दार आहे तर भाजपा महागद्दार आहे अशी संतप्त टीका माजी मंत्री रासपचे नेते महादेव जानकर यांनी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमरावतीत बच्चू कडू यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मोर्च्याला महादेव जानकर यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते म्हणाले की, शेतकरी आणि मेंढपाल एकत्र आले तर भारताची सत्ता हलवायची ताकद आपल्याकडे आहे. अमरावतीसारखा मोर्चा पुणे, छत्रपती संभाजीनगरलाही काढू. शेतकरी आणि मेंढपाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी लवकरात लवकर बैठक लावायली हवी. बच्चू कडू यांच्या प्रहारचा आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असते तर भविष्यात मोर्चे काढण्याची गरज भासली नसती. जिल्हाधिकारी, एसपी तुमच्या दारात येऊन तुमच्या मागण्या मान्य करतील असं त्यांनी सांगितले.
तसेच बच्चू भाऊंचा मला ८ दिवसांपूर्वी फोन आला. महादेवराव आम्ही एकत्र येऊया. आम्ही दोघेही फकीर आहोत, हे दोन फकीर एकत्रित आले तर महाराष्ट्रातील सत्ताही बदलून टाकू. अमरावतीचा मोर्चा हा झलक आहे ही फक्त सुरुवात आहे. मेंढपाळाच्या योजना सुरू करा. ज्या ज्या योजना आहेत त्यांना निधी देण्याचा प्रयत्न करा असंही महादेव जानकर म्हणाले.
दरम्यान, अमरावतीतील मेंढपाळांच्या समस्येसाठी बच्चू कडू यांनी मोर्च्याचे आयोजन केले होते. शेळ्या, मेंढ्याच्या चरईचा प्रश्न निर्माण झाला आहे.हजारो मेंढरे मारली जातात. वन विभाग कारवाई करतेय. त्यांचा व्यवसाय वाचावा यासाठी हा मोर्चा काढला आहे. पीक विम्याचे पैसे अजून मिळाले नाही असा आरोप बच्चू कडू यांनी केला.