महाड दुर्घटना शोध कार्य युध्दपातळीवर, 17 मृतदेहांचा शोध

By Admin | Updated: August 5, 2016 14:11 IST2016-08-05T14:02:20+5:302016-08-05T14:11:10+5:30

महाड जवळील सावित्री नदीवर असलेल्या पूल कोसळयाने वाहून गेलेल्या वाहनातील बेपत्ता प्रवाशी पैकी 17 जणांचे मृतदेह सापडले.

Mahad crash search work on war, 17 bodies searched | महाड दुर्घटना शोध कार्य युध्दपातळीवर, 17 मृतदेहांचा शोध

महाड दुर्घटना शोध कार्य युध्दपातळीवर, 17 मृतदेहांचा शोध

>
ऑनलाइन लोकमत            
अलिबाग दि. 5 - महाड जवळील सावित्री नदीवर असलेल्या पुल कोसळयाने  वाहून गेलेल्या वाहनातील बेपत्ता प्रवाशी पैकी सतरा जणांचे मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटलेली आहे. सदरील मृतदेह शवविच्छेदना नंतर संबंधितांच्या गावी पाठविण्यात येत आहेत.
या  दुर्देवी घटनेनंतर   महाड येथे बेपत्ता प्रवाशांच्या व वाहनांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने युध्द पातळीवर प्रयत्न करण्यात येत असून महाड येथे तातडीने  आपत्ती निवारण कक्ष तसेच मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पालकमंत्री प्रकाश महेता, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक हे शोध व मदत कार्याबाबत नियंत्रण करीत आहेत.
युध्द पातळीवर शोध कार्य
तटरक्षक दल व हवाई दलाच्या हेलिकॉप्टर द्वारे शोध कार्यासाठी सातत्याने मदत होत असून एनडीआरएफ च्या चार पथकातील 160 जवान तसेच एनडीआरएफच्या  9 बोटी व 8 डायव्हर्सद्वारे शोध कार्य सुरु आहे. स्थानिक पातळीवरील 35 पट्टीचे पोहणारे नागरीक, 5 राफ्टरर्स, 6 केकेज् टीम त्याच प्रमाणे स्थानिक मच्छिमार बांधव यांच्या मदतीने बेपत्ता व्यक्ती व वाहनांचा शोध घेण्याच्या मोहिम  सुरु  आहे. जिल्हा पोलीस यंत्रणेचेही जवळपास 350 अधिकारी, कर्मचारी यास मदत करत असून जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या मार्गदर्शनाखाली 6 डॉक्टरांचे पथक 12 पेक्षा अधिक रुग्णवाहिकेसह या भागात कार्यरत आहेत. नागरी संरक्षण दल, एस.टी. महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, विविध स्वयंसेवी संस्था, श्री संत निरंकारी मंडळ, सह्याद्री ॲडव्हेंन्चर ट्रेकर महाबळेश्वर यांचे पथक, व्हाईट आर्मी जीवन मुक्ती सेवा संस्था, कुंडलिका राफ्टींग असोशिएश्न, श्रमिक मच्छिमार संघ, मालवण आदिंचा मोठा सहभाग शोध मोहिमेत आहे.  अप्पर पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शोध मोहिमेचे कार्य सुरु असून नदीच्या पुढील भागातही त्या-त्या ठिकाणचे तालुका प्रशासन बेपत्ता नागरीकांचा शोध घेण्याच्या कामी युध्द पातळीवर प्रयत्‍न करत आहेत.
मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, महसूल प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांच्या मार्फत मार्गदर्शन करीत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच तज्ञ मंडळी, प्रसार माध्यम, नागरीक यांच्या कडून आलेल्या सूचनांचाही विचार प्रशासन करीत असून त्या नुसार शोध मोहिम अधिक जोरात केली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 24 X 7 कार्यरत असून टोल फ्री क्रमांक 1077 वर माहिती तसेच मदत कार्याबाबत समन्वय करण्यात येत आहे. तसेच घटनास्थळी व तहसिलदार कार्यालय, महाड येथे मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांची भोजन व निवास व्यवस्था महाड येथे करण्यात आली आहे.
सापडलेल्या मृत व्यक्तींचे नावे
दिनांक 05/08/2016  दुपारी 1.30 वाजे  अखेर एकूण 17 मृतदेह आढळून आले असून त्यांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. 1.) श्रीकांत शामराव कांबळे,   2.) शेवंती मिरगल,  3.) संपदा संतोष वाझे, 4.) आवेद अल्ताफ चौगुले, 5.) पांडूरंग घाग, 6.) प्रशांत प्रकाश माने, 7.) स्नेहा सुनिल बैकर,  8.) प्रभाकर बाबुराव शिर्के, 9.) रमेश गंगाराम कदम, 10.) मंगेश राजाराम काटकर, 11.) सुनिल महादेव बैकर 12.) अनिश संतोष बेलेकर, 13.) अतिफ मेमन चौगुले 14.) बाळकृष्ण बाब्या वरक, 15.) अजय सिताराम गुरव, 16.) विजय विश्राम पंडित, 17.) विनिता विजय पंडित.
महाडच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे व त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी महाड येथील नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. तसेच या शोध कार्या संदर्भात अधिक माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे 24 X 7 असा नियंत्रण कक्ष सुरु असून अप्पर जिल्हाधिकारी पी डी मलिकनेर व निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल हे नियंत्रण करीत आहेत. 02141-222118 टोल फ्री नंबर 1077 असे नियंत्रण कक्षाचे क्रमांक आहेत.
 

Web Title: Mahad crash search work on war, 17 bodies searched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.