ऑनलाइन लोकमत -
महाड, दि. 5 - महाडच्या सावित्री नदीमध्ये सलग तिस-या दिवशीही शोधकार्य सुरु आहे. पावसामुळे शोधकार्यात अडथळा येत असला तरी सावित्री नदीत वाहून गेलेल्या तवेरा कारचे काही अवशेष सापडले आहेत. तब्बल 63 तासांच्या शोधमोहिमेंतर कारचे अवशेष सापडले आहेत. घटनास्थळापासून अडीच किलोमीटर अंतरावर कारचे अवशेष आढळून आले.
सकाळी पावसामुळे शोधकार्यात अडथळा आला होता. शोधकार्याचा आजचा तिसरा दिवस असून, रात्रभर महाड परिसरात पावसाची संततधार सुरु होती. सकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. एनडीआरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डने सकाळी नऊच्या सुमारास शोधमोहीमेला सुरुवात केली. कारचे अवशेष सापडल्याने या दुर्घटनेत बुडालेली बस आणि इतर वाहनं याच ठिकाणी असण्याचा अंदाज आहे..म्हणून तवेरा ज्या भागात आढळली त्याच पात्राजवळ शोधमोहिम अधिक वेगानं सुरु केली आहे.
तवेरा गाडीच्या कॅरिअरचा भाग, चटई आणि काही सामान घटनास्थळापासून 2.5 किमी अंतरावर सापडलं आहे. दरम्यान नवेवाडी –येथील आंबेत येथे पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. मात्र त्याची ओळख पटलेली नाही. आतापर्यंत एकूण 21 मृतदेह हाती लागले आहेत.