Santosh Bangar: उद्धव ठाकरेंवर निष्ठा, बंडखोरांवर बोचरी टीका, मग अचानक भूमिका का बदली? संतोष बांगर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 14:49 IST2022-07-06T14:41:11+5:302022-07-06T14:49:34+5:30
Santosh Bangar News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर निष्ठा व्यक्त करत बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या संतोष बांगर यांनी अचानक बाजू बदलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

Santosh Bangar: उद्धव ठाकरेंवर निष्ठा, बंडखोरांवर बोचरी टीका, मग अचानक भूमिका का बदली? संतोष बांगर म्हणाले...
हिंगोली - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनलेल्या उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या काळात काही मोजकेच आमदार उद्धव ठाकरेंसोबत उरले होते. त्यातील एक आमदार होते संतोष बांगर. मात्र या संतोष बांगर यांनी विशेष अधिवेशनात अध्यक्षांच्या निवडीपर्यंत उद्धव ठाकरेंच्या गटाला साथ दिली. तर दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीवेळी ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर निष्ठा व्यक्त करत बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या संतोष बांगर यांनी अचानक बाजू बदलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान, हिंगोली येथे आलेल्या संतोष बांगर यांच्याकडे याबात विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, याच संतोष बांगर यांनी बंडाच्या सुरुवातीच्या दिवसांत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, स्वाभिमानाने जगा, असा सल्ला बंडखोर आमदारांना दिला. तर बंडखोरांचे काही चांगले होणार नाही. त्यांना नागरिक रस्त्याने फिरू देणार नाहीत. त्यांच्यावर सडके टमाटे, अंडे फेकतील. त्यांच्या तोंडाला काळे लावतील, असेही ते जोशात बोलण्याच्या ओघात बोलून गेले. एवढेच नव्हे, तर बंडखोरांच्या बायकासुद्धा त्यांना सोडून जातील. त्यांच्या लेकरांना कोणी मुली देणार नाही. ते मुंजे राहतील, असेही म्हटले. ईडीच्या भीतीनेही अनेक आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र माझ्यामागे अशी ईडी लावली असती तर तिला काडी लावली असती, असेही ते म्हणाले होते.
मात्र विधानसभेत शिंदे सरकार विश्वासमत प्रस्तावाला सामोरे जात असतानाच अचानक संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले होते. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि ते दुसऱ्या दिवशी थेट शिंदे गटाच्या आमदारांच्या बसमध्ये दिसले होते.