व-हाडातील धरणात अत्यल्प जलसाठा

By Admin | Updated: February 11, 2015 23:59 IST2015-02-11T23:59:44+5:302015-02-11T23:59:44+5:30

दुष्काळाचे सावट; पश्‍चिम व-हाडातील ९३ हजार हेक्टरवरील फळबागा धोक्यात !

Low-water storage in the dam | व-हाडातील धरणात अत्यल्प जलसाठा

व-हाडातील धरणात अत्यल्प जलसाठा

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा) : अत्यल्प जलसाठय़ामुळे पश्‍चिम वर्‍हाडातील सरासरी ९३ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा धोक्यात आल्या आहेत.
मान्सुनने दगा दिल्यामुळे खरीप हंगामात शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणावर झळ सोसावी लागली. त्यानंतर रब्बी हंगामालाही अत्यल्प पावसाचा फटका बसला आहे. अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील ओलिताची सोय असलेल्या शेतकर्‍यांनी सरासरी ९३ हजार ३३ हेक्टर क्षेत्रावर फळबाग फुलविली आहे. परंतु, विभागातील बहुतांश धरणांमध्ये सरासरी ४0 टक्क्याच्या आतच जलसाठा उरला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकाळी तालुक्यातील काटेपुर्णा धरणात २८ टक्के जलसाठा असून, दगडपारवा धरणातील जलपातळी शुन्यावर पोहचली आहे. पातुर तालुक्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात ४0 टक्के, मुर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम धरणात १७ टक्केच जलसाठा आहे. निगरुणा व तेल्हारा तालुक्यातील वाण धरणातील पाणी पातळीही खालावत चालली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणात ४५ टक्के, खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात ६0 टक्के व इतर धरणांमधील पाणी पातळीही खालावली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ४५ टक्केच जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील पूस प्रकल्प, महागाव तालुक्यातील लोअस पूस या मध्यम धरणातही जलसाठा खालावत चालला आहे. तर केळापूर परिसरातील सायखेडा मध्यम प्रकल्पाची पातळी ४७ टक्के व नेर तालुक्यातील गोकी मध्यम प्रकल्पाची पातळी ५0 टक्क्यावर पोहचली आहे. घाटंजी तालुक्यातील वाघाडी मध्यम प्रकल्प, बोरगाव मध्यम धरणांसह अमरावती जिल्ह्यातील जलसाठाही खालावत चालला आहे. अमरावती विभागातील बहुतांश धरणातील जलसाठे ४0 टक्केच्या खाली आल्याने फळबांगावर पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले आहे.

*फळबागा धोक्यात
शेतकर्‍यांचा आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा कल वाढला असल्याने फळबाग लागवडीच्या क्षेत्रातही वाढ होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात २0 हजार १८१ हेक्टर, अकोला जिल्ह्यात १७ हजार ६0४ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३ हजार ५८४ हेक्टर, अमरावती जिल्ह्यात ३२ हजार ३५ हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात १९ हजार ६२८ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे.

Web Title: Low-water storage in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.