सुजित महामुलकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महामुंबईत कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी आपल्या मतदारसंघातील गणेशभक्तांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मुंबईतील आजी-माजी आमदारांनी मोफत एसटी प्रवासाची व्यवस्था केली आहे. त्यातून त्यांनी मतदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. गिरगाव, दादर, भायखळा, लालबाग, परळसह उपनगरातील घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, वांद्रे, अंधेरी, कांदिवली, बोरिवली, दहिसर येथून गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक असते. त्यांच्या सोयीसाठी आपापल्या मतदारसंघातून राजकारण्यांनी बसची व्यवस्था केली आहे. गणेशोत्सवाच्या चार दिवस आधी या बस कोकणात रवाना होतील. सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही त्यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील मतदारांसाठी जवळपास ४० एसटी बसची सोय केली आहे. यातील रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग आणि मुरुड-जंजिरा भागात तुलनेने अधिक गाड्यांचे बुकिंग होत असल्याचे शेलार यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. कांदिवली (चारकोप) मतदारसंघाचे भाजप आ. योगेश सागर १३ वर्षांपासून गणपतीत बससेवा देतात. पूर्वी १५-१६ बसेस असत, आता रेल्वे व खासगी गाड्यांचा पर्याय वाढला आहे. यंदा आम्ही दोन वातानुकूलित बस सवलतीच्या दरात दिल्या आहेत आणि चांगला प्रतिसादही मिळत आहे, असे आ. सागर यांनी सांगितले. ही सेवा निवडणुकीशी संबंधित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दादर, शिवाजी पार्क भागात माजी आ. सदा सरवणकर यांनी कोकणात जाण्यासाठी इच्छुकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर हे माजी नगरसेवक आहेत. तर त्यांची कन्या प्रिया गुरव-सरवणकर महिला विभागप्रमुख आहे. मुंबईतील काही मंत्री, तसेच उद्धवसेनेच्या आमदारांकडून दरवर्षी बस सोडण्यात येतात. त्यांच्याकडूनही तयारी सुरू असल्याचे समजते.
१९८ एसटी बसचे आरक्षणगेल्यावर्षी २०२४ मध्ये गणेशोत्सवासाठी २ ते ९ सप्टेंबर या कालावधीत कोकणात एकूण १,७९९ एसटी बस मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला डेपोतून सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी याच डेपोतून २४ जुलैपर्यंत १९८ बसचे बुकिंग झाले आहे. सण जवळ येतो तसे बुकिंग वाढते. सर्वाधिक गाड्यांचे आरक्षण परळ डेपोतून होते. यावर्षी २४ ते २७ ऑगस्ट या चार दिवसांत कोकणात गाड्या सोडण्यात येतील, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.