परिवहन मंत्र्यांच्या घोषणेला एसटीचा खो
By Admin | Updated: July 19, 2016 21:19 IST2016-07-19T21:19:55+5:302016-07-19T21:19:55+5:30
विद्यार्थ्यांना दरवर्षी एसटीची सवलत पास दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन यावर्षी अशा पासेस शाळेतूनच वितरित करण्याची घोषणा परिवहन

परिवहन मंत्र्यांच्या घोषणेला एसटीचा खो
- अविनाश साबापुरे
यवतमाळ, दि.19 - विद्यार्थ्यांना दरवर्षी एसटीची सवलत पास दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन यावर्षी अशा पासेस शाळेतूनच वितरित करण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. परंतु एसटी महामंडळाने या घोषणेची वासलात लावली असून, पासेसकरिता विद्यार्थ्यांन भर पावसात बसस्थानकावरच रांगा लावाव्या लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळ दरवर्षी राज्यातील साधारण १६ लाख विद्यार्थ्यांना मासिक शैक्षणिक सवलती पास वितरित केली जाते. खेडापाड्यातून तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी दररोज शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ६० टक्के सवलतीच्या पासमुळे मोठा आर्थिक हातभार लागतो. परंतु या पासेस मिळविण्यासाठी सर्व विद्यार्थी एकाच वेळी धाव घेत असल्यामुळे एसटी आगारात गर्दी होऊन विद्यार्थ्यांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागते. ही बाब लक्षत घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संबंधित शाळेमधूनच विद्यार्थ्यांना प्रवासी सवलतीच्या पासेस देण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.
जून महिन्यात शैक्षणिक सत्र सुरू होताच सुरूवातीच्या १० दिवसात एसटी महामंडळाचे कर्मचारी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पासेस वाटप करणार अशी घोषणा होती. परंतु शैक्षणिक सत्र सुरू होऊन पंधरवडा लोटल्यावरही हा उपक्रम बासनातच गुंडाळून आहे. राज्य परिवहन महामंडळातील सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शिवाय सध्या एसटीच्या हंगामाचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पासेससाठी शाळांमध्ये अतिरिक्त कर्मचारी पाठविणे शक्य नाही, असे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. काही अधिकारी आपण आगार प्रमुखांना सूचना दिल्याचे सांगून मोकळे होत आहे, तर कर्मचारी मात्र हा उपक्रम राबविणे शक्यच नसल्याचे खासगीत स्पष्ट करीत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातून दररोज यवतमाळात शिक्षणासाठी येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सध्या सवलतीच्या पासेससाठी बस स्थानकात रांगा लावाव्या लागत आहे. यवतमाळातील विविध शाळांमध्ये पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या जवळपास साडेचार हजार विद्यार्थ्यांना दर दिवशी बसस्थानकावरून पासेस वाटप केल्या जात आहे. त्यासाठी त्यांना शाळेतून बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन बसस्थानकावर दिवसभर रांगेत राहावे लागत आहे. खुद्द परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री यांनी घोषित केलेल्या योजनेला महामंडळाच्याच कर्मचाऱ्यांनी हरताळ फासल्याचे दिसत आहे.
सर्व आगार प्रमुखांना सूचना दिल्या आहे. मात्र हा उपक्रम कोणत्या आगाराने सुरू केला किंवा कोणत्या आगाराने नाही केला, याविषयी माहिती घेऊन कळविण्यात येईल. मात्र सध्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहेच.
-मुक्तेश्वर जोशी, विभागीय वाहतूक अधिकारी, यवतमाळ