आपत्कालीन प्रशिक्षणालाच खो
By Admin | Updated: August 5, 2016 00:28 IST2016-08-05T00:28:38+5:302016-08-05T00:28:38+5:30
शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी पोलिसांना दिले होते.

आपत्कालीन प्रशिक्षणालाच खो
पुणे : राज्यामध्ये येऊ शकणाऱ्या आपत्तींचा सामना कसा करावा, यासाठी पोलिसांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी पोलिसांना दिले होते. पुणे पोलिसांनी मात्र महासंचालकांच्या या आदेशाला गांभीर्याने घेतलेले नसून, पोलीस ठाण्यांकडून त्याबाबत एकही सत्र घेण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत पोलीसही उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तत्कालीन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी चार महिन्यांपूर्वी एक आदेश जारी करून राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील शाळा-महाविद्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचे आदेश दिले होते. यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन आणि अग्निशामक दलाची मदत घेऊन पूर, आग, पडझड, वादळ आदी आपत्तींमध्ये नेमके काय करावे, बचाव कार्य कसे करावे, वैद्यकीय मदत कशी उभरावी यांसह काही महत्त्वाच्या बाबींचे प्रशिक्षण देण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पोलीस महासंचालक कार्यालयाने तसे पत्र सर्व पोलीस आस्थापनांना पाठविले होते.
पुणे पोलिसांना हा आदेश मिळताच सर्व पोलीस ठाण्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस ठाण्यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रांची माहिती विशेष शाखेला पाठविण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या होत्या. मात्र, हा सर्व सोपस्कार कागदोपत्रीच राहिला. कोणत्याही पोलीस ठाण्यांनी या संदर्भात गांभीर्य दाखविले नाही. पोलीस ठाणे स्तरावर
असलेली उदासीनता या उपक्रमाच्या आडवी आली आहे. शालेय
विद्यार्थी कोणाचा जीव जरी नाही वाचवू शकले, तरी स्वत:चे तरी आपत्तीमधून रक्षण करतील, असे प्रशिक्षण त्यांना मिळाले असते.
>प्रशिक्षणच नाही
पुण्यात नेहमी झाडपडी, जुन्या वाड्याच्या भिंती पडणे, इमारतीचे स्लॅब कोसळणे, पावसाळ्यात तर नदीपात्र दुथडी भरुन वाहत असते. अशा वेळी स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रणांना प्रशिक्षित तरुणांची मदत मिळू शकते.
परंतु, उत्साहाचाच दुष्काळ असलेल्या पोलीस ठाण्यांनी पोलीस महासंचालकांचा हा आदेश गांभीर्याने घेतलाच नाही. गेल्या चार-सहा महिन्यांत कोणत्याही शाळा-महाविद्यालयात पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेच नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.