नगरमध्ये आदेश्वर भगवान मिरवणूक
By Admin | Updated: January 21, 2016 04:01 IST2016-01-21T04:01:46+5:302016-01-21T04:01:46+5:30
आदेश्वर भगवान यांच्यासह १३ तीर्थंकरांच्या चांदीच्या रथात विराजमान झालेल्या मूर्ती़, ध्वजधारी घोडेस्वार, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला़़

नगरमध्ये आदेश्वर भगवान मिरवणूक
अहमदनगर : आदेश्वर भगवान यांच्यासह १३ तीर्थंकरांच्या चांदीच्या रथात विराजमान झालेल्या मूर्ती़, ध्वजधारी घोडेस्वार, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला़़. जैन मुनींसह सहभागी झालेले भाविक आणि ढोल-झांजपथकांच्या गजरात भगवंताचा झालेला जयघोष, अशा उत्साही आणि मंगलमय वातावरणात बुधवारी आदेश्वर भगवान मिरवणूक सोहळा रंगला.
नगरमध्ये १२५ वर्षांनंतर काढण्यात आलेली ही मिरवणूक ऐतिहासिक ठरली़ गुजरगल्ली येथील जैन मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बुधवारी आदेश्वर भगवानांसह १३ तीर्थंकरांच्या मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. पन्यास दर्शनवल्लभ विजयजी यांनी मांगलिक दिल्यावर सकाळी मिरवणुकीस प्रारंभ झाला़ ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या़ जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी मिरवणुकीचे संयोजन केले़
आज मूर्तींचा गाभारा प्रवेश
मंदिरातून पाच वर्षांपूर्वी हलविलेल्या मूर्ती पुन्हा मंदिरात स्थापन करण्यात येणार आहेत़ त्याची विधिवत प्रतिष्ठापना एप्रिलमध्ये होईल. आदेश्वर भगवान यांची मुख्य प्रतिमा आणि इतर १३ भगवानांच्या मूर्तींचा गाभारा प्रवेश मुहूर्त गुरुवारी पहाटे आहे़ (प्रतिनिधी)